आ. गणपत गायकवाड प्रकरणात शिवसेनेचे भाजपवर दबावतंत्र, मंत्र्यांनी फडणवीसांकडे व्यक्त केली नाराजी

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाला आता वेगळा रंग येऊ लागला आहे. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आ. गणपत गायकवाड प्रकरणात शिवसेनेचे भाजपवर दबावतंत्र, मंत्र्यांनी फडणवीसांकडे व्यक्त केली नाराजी

मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाला आता वेगळा रंग येऊ लागला आहे. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याचे पडसाद आता उमटले असून शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. गणपत गायकवाड यांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. भाजपने गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे. विरोधकांच्या हातात यामुळे आयताच मुद्दा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्याबद्दल आम्ही आमचे मत देवेंद्र फडणवीसांसमोर मांडले. हे चुकीचे असून भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली. समन्वय समितीच्या नियमित बैठका होत असतात. पण दरम्यानच्या काळात होऊ शकल्या नाहीत. यावर मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री असे तिघे दोन दिवसांत एकत्र बसतील आणि नियमित बैठका कशा घ्याव्यात याबाबत ते पुढचे धोरण ठरवतील. गणपत गायकवाड ज्या जिल्ह्यातून येतात त्या जिल्ह्याचा मी पालक मंत्री आहे. दीड वर्षात गायकवाड यांनी कधी हा विषय मांडला नाही. समन्वय समितीतही मांडला नाही. त्यांनी पहिल्यांदाच आरोप केला. आम्ही आमचे मत मांडले. त्याची दखल देवेंद्र फडणवीस घेतील, असे शंभूराज देसाई म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत शंभूराज देसाई म्हणाले, मनोज जरांगे-पाटील यांचा प्रश्न सुटलेला आहे. सग्यासोयऱ्यांच्याबाबत अध्यादेश काढण्यात आला त्याची प्रत स्वत: मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली. त्यामुळे आता त्यांना आंदोलन करण्याची गरज नसावी. सग्यासोयऱ्यांबाबतच्या अध्यादेशासंदर्भातील निर्णय येत्या अधिवेशनात होईल. मराठा आंदोलनाबाबतचे सगळे विषय सकारात्मकपणे सुटलेले आहेत. परत परत आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेऊ नये. सरकारने जे आश्वासन दिले त्याची पूर्तता करण्यासाठी सरकार सक्षम असल्याचेही देसाई म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in