उज्ज्वला गॅस योजनेच्या सिलिंडरचाही व्यावसायिक वापर

उज्ज्वला गॅस योजनेच्या सिलिंडरचाही व्यावसायिक वापर

जव्हारसारख्या आदिवासी आणि अतिदुर्गम भागात राहून रोजगाराची वानवा असणाऱ्या नागरिकांना दिवसेंदिवस होत असलेली गॅस सिलेंडरची दरवाढ हा खूप चिंतेचा आणि डोकेदुखीचा विषय ठरत असून छोटे व्यावसायिक, चहा टपरीवाले आणि खानावळवाले नाइलाजास्तव घरगुती व उज्ज्वला सिलेंडरचा वापर होत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत भडका उडाला आहे. याचा सर्वाधिक फटका चहा टपरी, नाश्ताविक्रेत्यांना बसला आहे. विक्रेत्यांनी खाद्यपदार्थांच्या किमती वाढविल्या; पण दर महिन्याला सिलिंडरच्या किमती आणखी वाढत असल्याने विक्रेत्यांना व्यावसायिक ताळमेळ बसवणे अवघड होऊन बसले आहे. नाईलाजाने काही विक्रेत्यांना घरगुती गॅसचा वापर व्यवसायासाठी करावा लागत आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत सध्या २,४०२.५० रुपये तर घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १००८.५० रुपये आहे. गॅस आता अन्नपदार्थ विक्रेत्यांना डोईजड झाला आहे. कारण, एका महिन्यात चार-पाच सिलिंडर लागतातच. कमीतकमी १० हजार रुपये महिन्याकाठी एका विक्रेत्याला गॅस सिलिंडरवरच खर्च करावे लागत आहेत, गॅसच्या दरवाढीवर अंकुश कुणी ठेवायचा? व्यवसाय न केल्यास कुटुंब चालवायचे कसे? असे प्रश्न सोडविण्यासाठी नाईलाजास्तव घरगुती सिलेंडर वापरण्याची वेळ शहरातील छोटे व्यावसायिकांवर आली आहे.

सध्या खाद्यपदार्थ, डाळीचे भाव वाढल्याने अखेर मागील आठवड्यात कचोरी, समोसा, भजे, समोशाच्या किमती वाढविल्या. पण पुन्हा एकदा व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्याने अखेर ‘चाट’ पदार्थाचे भाव न वाढविता व्यावसायिक गॅस सिलिंडरसोबत घरगुती सिलिंडरचा वापर सुरू आहे.

- रवी चौधरी, व्यावसायिक, जव्हार

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in