मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यावर आचारसंहितेचे सावट, निधीच्या संबंधित घोषणा करण्यास आयोगाचा मज्जाव

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री रविवारी पंढरपूर दौऱ्यावर असणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यावर आचारसंहितेचे सावट, निधीच्या संबंधित घोषणा करण्यास आयोगाचा मज्जाव

राज्यातील ९६ नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे शुक्रवारपासूनच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आषाढी एकादशीनिमित्तच्या पंढरपूर दौऱ्यावर आचारसंहितेचे सावट असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  पंढरपूर दौऱ्यात विठ्ठलाची महापूजा करण्यास निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दिला आहे. मात्र शासकीय कार्यक्रमामध्ये निधीच्या संबंधित कोणतीही घोषणा करण्यास आयोगाने मज्जाव केला आहे. 

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री रविवारी पंढरपूर दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात त्यांचे एकूण सहा कार्यक्रम होणार आहे. मात्र, राज्यात नगरपरिषद निवडणूक जाहीर झाल्याने या कार्यक्रमांना आचारसंहितेचा अडसर ठरू नये म्हणून  जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. निवडणूक आयोगाने त्यांना परवानगी दिली आहे. मात्र त्यात तीन अटीं घालण्यात आल्या आहेत.  पूर्वनियोजित शासकीय कार्यक्रमांमध्ये कोणत्याही निधी विकास योजना, कार्यक्रमांची घोषणा करू नये, अशी यात प्रमुख अट घालण्यात आली आहे. शिवाय या सर्व कार्यक्रमांसाठी आवश्यक त्या नियमानुसार परवानग्या घेण्यात याव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. 

कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे, पण त्या ठिकाणीही वरील अटींचे पालन व्हावे, असे सांगण्यात आले आहे. विश्रामगृह येथे 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' याचा समारोप सोहळा होणार आहे. एकादशीच्या दिवशी पहाटे शासकीय महापूजा झाल्यावर पहाटे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेनेच्या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in