संपूर्ण स्वच्छता अभियानात आयुक्त ग्राऊंड झीरोवर: रस्त्यांच्या दुतर्फा बेवारस वाहने हटवा; आयुक्तांचे सक्त निर्देश

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या निर्देशानुसार, स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी पालिकेकडून प्रत्‍येक प्रशासकीय विभागात सखोल स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात येत आहे.
संपूर्ण स्वच्छता अभियानात आयुक्त ग्राऊंड झीरोवर: रस्त्यांच्या दुतर्फा बेवारस वाहने हटवा; आयुक्तांचे सक्त निर्देश

मुंबई : मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला, त्यानंतर मे महिन्यात पदभार स्वीकारताच पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी स्लम एरियात जाऊन आढावा घेतला होता. आता पुन्हा एकदा स्वच्छता मोहिमेत सक्रिय होऊन स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. चहल यांनी शनिवारी अंधेरी पूर्व व गोरेगाव येथे स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेत स्वतः गल्लीबोळातील रस्त्यांची सफाई करत पाणी फवारणी केली. दरम्यान, रस्त्यांच्या दुतर्फा बेवारस वाहने, रस्त्यांवर लटकणाऱ्या केबल हटवण्याचे सक्त निर्देश चहल यांनी पालिकेच्या संबंधित विभागाला दिले.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या निर्देशानुसार, स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी पालिकेकडून प्रत्‍येक प्रशासकीय विभागात सखोल स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात येत आहे. यापूर्वी प्रत्येक परिमंडळात एक याप्रमाणे सात परिमंडळांमध्ये मिळून एकूण सात प्रशासकीय विभागांमध्ये ही मोहीम राबवली जात होती. त्या कार्यपद्धतीनुसार सर्व प्रशासकीय विभागांचा क्रम पूर्ण झाला. स्‍वच्‍छता ही निरंतर प्रक्रिया असल्‍याने त्‍यात सातत्‍य राखायला हवे, या भूमिकेतून चहल यांच्‍या निर्देशानुसार, आता यापुढे दर शनिवारी सर्व २४ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी करण्यात आलेल्या कार्यवाहीस सर्वत्र स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

रस्ते, पदपथ, लहानसहान गल्लीबोळांमध्ये असलेला घनकचरा तसेच टाकाऊ वस्तू पूर्णपणे काढणे, तसेच ब्रशिंग करून रस्ते, पदपथांवरील धूळ काढणे, त्यानंतर पाण्याने धुणे ही सर्व कार्यवाही करतानाच रस्‍त्‍यांवर उगवलेली खुरटी झाडेझुडपे समूळ काढणे, अवैध जा‍हिरात फलक हटविणे, कीटकनाशक धूर फवारणी, पावसाळी जाळ्या- गटारे व नाले यांची स्‍वच्‍छता, धोकादायक तारांचे जंजाळ काढणे आदी विविध कामे सखोल स्वच्छता मोहिमेतून करण्यात येत आहेत. चहल यांनी शनिवारी सकाळी ८ वाजेपासून केलेल्या दौऱ्यात या सर्व कार्यवाहीची पाहणी करतानाच स्वतः सखोल स्वच्छता मोहिमेत प्रत्‍यक्ष सहभाग देखील घेतला. यावेळी उप आयुक्‍त (परिमंडळ ४) विश्‍वास शंकरवार, उपायुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे यांच्‍यासह के पूर्वचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू, पी दक्षिणचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव आणि इतर संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गल्लीबोळात शिरून स्वच्छता!

पी दक्षिण विभागातील गोरेगाव पश्चिम येथील स्‍वातंत्र्यवीर सावरकर चौक, सुंदर नगर जंक्‍शन, खंडू भंडारी चौक, विठ्ठलपाडा परिसरांमध्ये स्‍वच्‍छता मोहिमेत आयुक्‍त महोदय प्रत्‍यक्ष सहभागी झाले. विठ्ठलपाडा येथील अरुंद वसाहतीत लहानसहान गल्‍लीबोळांमध्ये शिरून आयुक्तांनी स्‍वच्‍छता केली. पाणी फवारणी करत गल्ली स्वच्छ केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in