लॅपटॉपचा अपहार करुन कंपनी मालकांचे पलायन

प्रकार लक्षात येताच कंपनीच्या वतीने एमआरए मार्ग पोलिसांत तक्रार केली होती
लॅपटॉपचा अपहार करुन कंपनी मालकांचे पलायन

मुंबई : सुमारे ८२ लाख रुपयांच्या लॅपटॉपचा अपहार करून एका खासगी कंपनीच्या मालकाने पलायन केल्याची घटना फोर्ट परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनीच्या दोन्ही मालकाविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. सुभाष गुरव आणि जिगर रमेश मारू अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. आशुतोष विजय सिंग यांची कंपनी संगणक, लॅपटॉप, डेक्सटॉप, प्रिंटर, कॉपिअर, स्कॅनर आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करुन विविध खाजगी कंपन्यासह शासकीय कार्यालयाला होलसेलमध्ये विक्री करतात.

गेल्या काही महिन्यांत सुभाष गुरव यांनी त्यांच्या कंपनीकडून ८२ लाख ५७ हजार रुपयांचे लॅपटॉप घेतले होते. मात्र त्याचे पेमेंट देण्यास ही कंपनी टाळाटाळ करत होती. कॉल करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आरोपीच्या दादर येथील कार्यालयाला भेट दिली असता, सुभाष आणि जिगर यांच्या कार्यालयाला टाळे असल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या वतीने एमआरए मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in