
मुंबई : यूट्यूबवरील रिॲलिटी कॉमेडी शोचा निर्माता, परीक्षक रणवीर अलाहाबादीया याच्याविरुद्ध अश्लील भाषा आणि सामग्रीच्या वापराबद्दल एका भाजप पदाधिकाऱ्याने सोमवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. पोलीस उपायुक्त (परिमंडळ ९) दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, या तक्रारीवर चौकशी सुरू आहे. आतापर्यंत कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
लोकप्रिय सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व रणवीर अलाहाबादीया याला "इंडियाज् गॉट लेटंट" या समय रैनाच्या शोमध्ये पालक आणि लैंगिक संबंधांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे ट्रोल केले जात आहे.
हा शो तरुणांमध्ये लोकप्रिय असून तो धक्कादायक आणि आक्षेपार्ह स्वरूपाचा असल्याचे म्हटले जाते. समय रैनाच्या "इंडियाज् गॉट लेटंट" यूट्यूब शोवर त्याने केलेल्या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर तो ट्रेंडमध्ये आला होता.
अलाहाबादीयाने सोमवारी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. त्याच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी त्याच्या पॉडकास्टवर बंदी घालण्याची मागणी केली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेत्यांनीही त्यांच्यावर टीका करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याचा आरोप केला.
अलाहाबादीया हा त्याच ऑनलाइन कंटेंट क्रिएटर्सपैकी एक आहे ज्याला गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड दिला होता. याआधी त्याने डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनसोबत भागीदारी करून विविध केंद्रीय मंत्र्यांची मुलाखतही घेतली होती.
भाजप पदाधिकारी नीलोत्पल मृणाल पांडे यांनी खार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत रैना, अलाहाबादीया आणि यूट्यूबर आशीष चंचलानी यांच्यासह इतरांची नावे घेतली आहेत. या शोमध्ये अपमानास्पद भाषा वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पांडे यांनी तक्रारीसोबत एका पेनड्राइव्हमध्ये संबंधित व्हिडीओ सादर केला आहे.
पोलिसांच्या मते, पांडे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. तसेच हा शो अपशब्द, अश्लिलता आणि नग्नतेला प्रोत्साहन देत असून तो तरुणांवर नकारात्मक प्रभाव टाकतो आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांच्या विरोधात जातो, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित व्हिडीओ पाहिलेला नसला तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडू नयेत, अशी सूचना दिली.
शोवर बंदी हवी - वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही अलाहाबादीयाच्या भाषेवर टीका केली आहे. ते म्हणाले की, अलाहाबादीयावर कारवाई करावी. अशा शोवर बंदी घालण्यात यावी. या माध्यमातून नक्की काय संदेश दिला जात आहे, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. एक पालक म्हणून हे ऐकून त्रास झाला, असे ते म्हणाले. अलाहाबादीयाला पंतप्रधान मोदींकडून पुरस्कार मिळाल्याचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, भविष्यात अशा व्यक्तींना सन्मानित करण्यापूर्वी दोनदा विचार करावा. कारण त्यामुळे अशा लोकांना प्रोत्साहन मिळते.
रणवीरने अखेर माफी मागितली
कॉमेडी माझ्या कुवतीबाहेर आहे. मी इथे फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे, असे बिअरबायसेप्स नावाने ओळखला जाणारा हा यूट्यूबर म्हणाला. अनेकांनी विचारले की, मी माझे व्यासपीठ याच प्रकारे वापरणार आहे का? अर्थातच नाही. मी काहीही स्पष्टीकरण देणार नाही. फक्त माफी मागतो. मी वैयक्तिकरीत्या चुकीचा निर्णय घेतला. माझ्या बाजूने ते योग्य नव्हते. तरुण प्रेक्षकांसाठी खराब उदाहरण निर्माण केल्याबद्दल टीका होत असलेल्या या सोशल मीडिया प्रभावशाली व्यक्तीने सांगितले की, जबाबदारी घेणारा व्यक्ती बनण्याची त्याची इच्छा नाही. कुटुंब हे शेवटचे असेल जे मी कधीही अपमानित करेन. हे व्यासपीठ चांगल्या गोष्टींसाठी वापरायला हवे आणि हीच माझ्यासाठी या संपूर्ण अनुभवातून शिकण्यासारखी गोष्ट आहे. मी सुधारण्याचे वचन देतो. व्हिडीओमधून संवेदनशील भाग काढून टाकण्यासाठी निर्मात्यांना विनंती केली आहे. मी फक्त माफी मागतो. कृपया माणूस म्हणून मला क्षमा करा, तो म्हणाला.
प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा ते इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणते तेव्हा ते चुकीचे ठरते. आपल्या समाजात काही नियम ठरवले गेले आहेत आणि कोणीही त्यांचे उल्लंघन करणे चुकीचे आहे. अशा प्रकरणांवर कारवाई व्हावी. माझ्या माहितीप्रमाणे माध्यम व्यासपीठावर अत्यंत अश्लील भाषा वापरली गेली आहे. अर्थातच ती पूर्णपणे चुकीची आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री