नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी उद्वाहनचे काम पूर्ण केले

नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी उद्वाहनचे काम पूर्ण केले
Published on

मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे या मार्गावरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्टची सोय करावी, अशी मागणी होत होती. त्यामुळे रेल्वे बोर्डने नेरळ रेल्वे स्थानकात उद्वाहनची व्यवस्था करण्याची मागणी पूर्ण केली आहे. नेरळ रेल्वे स्थानकातील उद्वाहनचे काम पूर्ण झाले असून आता ती सुविधा कधी कार्यान्वित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. हे उद्वाहन १० जूनला सुरू होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नेरळ रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाची निर्मिती झाल्यांनतर त्याची उंची पाहून सर्वांची दमछाक होत होती. तब्बल ४७ पायऱ्या एका बाजूला असलेल्या त्या पादचारी पुलाबाबत सतत तक्रारी येत होत्या. त्यानंतर स्थानिकांनी उद्वाहन आणि सरकते जिने उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार नेरळ स्थानकात उद्वाहन उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता नेरळ स्थानकात फलाट दोनवर उभारलेल्या उद्वाहनाचे लोकार्पण कधी होणार? याची उत्सुकता प्रवासी वर्गाला होती. लोकार्पण लवकर व्हावे, अशी मागणी नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी केली होती.

सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला लेखी स्वरूपात विचारणा केली असता चाचणी प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यावर १० जून रोजी हे उद्वाहन सुरू होण्याची शक्यता असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक गौरव झा यांनी लेखी स्वरूपात कळविले आहे.

logo
marathi.freepressjournal.in