निष्पक्षपाती तपास करा; हायकोर्टाचे आदेश ; पोलिसांकडून वकिलांना मारहाण प्रकरण

एफआयआर नोंदवायचा की, नाही, हे कोण ठरवणार? असा सवाल करीत माटुंगा विभागाच्या एसीपींना न्यायालयात बोलावले होते
निष्पक्षपाती तपास करा; हायकोर्टाचे आदेश ; पोलिसांकडून वकिलांना मारहाण प्रकरण

मुंबई : महिन्याभरापूर्वी अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांकडून दोन वकिलांना झालेल्या मारहाण घटनेची उच्च न्यायालयाने गुरुवारी दखल घेतली. याप्रकरणी माटुंगा विभागाच्या एसीपींनी स्वतः लक्ष घालून निष्पक्षपाती तपास करावा, असे निर्देश न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने दिले.

अॅड . साधना यादव आणि अॅड . हरिकेश मिश्रा या दोघा वकिलांनी १८ मे रोजी झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नासिर कुलकर्णी व इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात केली आहे. त्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.

मागील सुनावणीच्या वेळी खंडपीठाने ज्या अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या आवारात घटना घडली, त्याच पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून एफआयआर नोंदवण्याची अपेक्षा काय बाळगायची? एफआयआर नोंदवायचा की, नाही, हे कोण ठरवणार? असा सवाल करीत माटुंगा विभागाच्या एसीपींना न्यायालयात बोलावले होते.

वकिलांची तक्रार माटुंगा पोलीस ठाण्यात वर्ग

गुरुवारी न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलांची तक्रार माटुंगा पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचे आदेश दिले. माटुंगा विभागाच्या एसीपींनी पोलीस उपायुक्त (डीसीपी) झोन-४ यांच्या देखरेखीखाली वकिलांच्या तक्रारीची निष्पक्षपणे चौकशी करावी, तसेच १८ मे रोजी दुपारी २.३० ते रात्री १२.३० या वेळेतील अँटॉप हिल पोलीस ठाण्यातील सातही कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज सादर करावे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले .

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in