गोंधळात गोंधळ

वर्षानुवर्षे पक्षांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याच्या रोषाला सामोरे जावे लागले, यामुळे वरिष्ठ नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे
 गोंधळात गोंधळ

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असली, तरी इच्छुकांमध्ये सद्य:स्थितीत संभ्रमाचे वातावरण आहे. शिंदे गट, उद्धव ठाकरे यांची शिवसेना की भाजप, कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊ हाती अशी द्वीधा मन:स्थिती सध्या इच्छुकांची झाली आहे, तर इच्छुक उमेदवाराला संधी दिली, तर वर्षानुवर्षे पक्षांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याच्या रोषाला सामोरे जावे लागले, यामुळे वरिष्ठ नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या सहकाऱ्याने राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली असली, तरी शिंदे यांच्या बंडामुळे सगळ्यांच राजकीय पक्षांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, हेही तितकेच खरे.

ओबीसी आरक्षण, राजकीय वाद अशा विविध कारणांमुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला; मात्र शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा वाद आता उफाळून आला आहे. शिंदे गटात रोज नवीन लोकांची भरती सुरू आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, उद्या सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी होईल आणि दिलासा मिळेल, अशी आशा शिंदे गट व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यासह मुंबईतील राजकीय परिस्थिती बदलण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आरक्षण सोडत जाहीर झाली असली, तरी कुठल्या पक्षाच्या झेंड्याखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरू अशी संभ्रमाची स्थिती इच्छुक व ज्या इच्छुकांचे प्रभाग जैसे थे आहे, त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. एकूणच यंदाची निवडणूक ही आरोप- प्रत्यारोपांसह गोंधळाच्या वातावरणात होणार हेही तितकेच खरे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता सर्वपक्षीय इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू करणे स्वाभाविक आहे; मात्र यंदाच्या निवडणुकीत तिकीटवाटपात सर्वाधिक डोकेदुखी शिवसेनेला ठरण्याची शक्यता आहे. सेनेकडून तिकीट नाकारलेले, नाराज आणि असंतुष्ट एकनाथ शिंदे गट, तसेच भाजपमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनाही तिकीट नाकारलेले उमेदवार सेनेच्या अधिकृत उमेदवाराला डोकेदुखी ठरतील, असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. नारायण राणे, राज ठाकरे यांच्या बंडांचा सेनेवर परिणाम झाला नाही. बंडानंतर राणे व राज ठाकरे यांची जादू पालिका निवडणुकीत चालली नाही.

दोन्ही नेत्यांच्या बंडांनंतर सन २००७ मध्ये पालिकेची निवडणूक झाली. त्यात राणे समर्थक म्हणणारे एखाद दोन नगरसेवक तर मनसेचे अवघे सात नगरसेवक निवडून आले होते. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाची जादू किती चालणार हे लवकरच स्पष्ट होईलच; मात्र शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे कार्यकर्त्यांमध्ये यंदाची निवडणूक उमेदवार असो वा अधिकारी, सगळ्यांसाठी तापदायक ठरणार, असे चित्र दिसून येत आहे.

यंदाच्या पालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजप आणि शिंदे गट असे दुहेरी संकट उभे राहणार यात शंका नाही. २०१७च्या निवडणुकीत पालिकेची सत्ता काबीज करण्याचा हातातोंडाशी आलेला घास अवघ्या दोन जागांनी हिरावला गेल्याने भाजपने यंदा एक वर्ष आधीपासूनच सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपने शिवसेना नेत्यांची पळता भुई केली आहे. त्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, शिंदे गट मिळाल्याने भाजप या गटाचा पुरेपूर वापर करू घेणारच. सेनेतील अधिकाधिक नाराज, असंतुष्ट उमेदवार, कार्यकर्ते शिंदे गटात कसे येतील, याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असावा. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार असली तरी शिवसेनेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in