मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेत गोंधळ

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेत गोंधळ

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपच्या मेहता समर्थक व व्यास समर्थक नगरसेवक आपसांत भिडलल्याचे पहायला मिळाले. दरम्यान व्यास समर्थक नगरसेविकेच्या मदतीला धावून जाणाऱ्या आमदार गीता जैन व मेहता समर्थक नगरसेविकांमध्येही शाब्दिक चकमक झाल्यानंतर मेहता समर्थक नगरसेविका आमदार जैन यांच्या अंगावर धावून गेल्याने एकच गदारोळ माजला.

या सर्व प्रकरणानंतर सभागृहात काही नगरसेविकांनी अपशब्द वापरल्याचे आरोप होत आहेत. तर कारण नसताना काही नगरसेवकांनी जाणीवपूर्वक हा गोंधळ घातल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेने महापालिकेची पूर्ती नाचक्की झाली असून सर्वत्र टीका होत आहे.

नक्की काय घडले ?

जिल्हाध्यक्ष ॲड. रवी व्यास यांच्या गटातील तसेच भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणाऱ्या भाजपच्या नगरसेविका निला सोंस यांनी मंगळवारच्या महासभेत त्यांच्या प्रभागातील मिरारोडच्या आरक्षण क्र. ३०५ मध्ये बगिचाच्या जागेत हॉटेल-बार बनविण्याविरुद्ध प्रस्ताव दिला होता. सायंकाळी त्यावर चर्चा सुरू झाली असताना सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने चर्चा करता येणार नाही, असे सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी सांगितले. त्यावर हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे याची माहिती असून वस्तुस्थिती मांडू शकते, तसेच पालिकेचा विधी विभाग बेकायदा बारला वाचवत असल्याने याबाबत निर्देश देण्याची मागणी केली.

त्यावर चर्चा होत असताना भाजपचेच मेहता समर्थक नगरसेवक अरविंद शेट्टी यांनी सोंस यांना तुम्हीच बेकायदेशीर बांधकामे केली असल्याचे व ब्लॅकमेल करत असल्याचे वक्तव्य केले. त्या नंतर मेहता समर्थक भाजप नगरसेविका रुपाली मोदी या थेट सोंस यांच्या जवळ धावत जात सोंस यांच्यावरमाेठ्या आवाजात बोलू लागल्या व त्यांचा माईक खेचला. नगरसेविका दीपिका अरोरा यांनी देखील सोंस यांच्या अनधिकृत कार्यालयाची माहिती द्यावी अशी मागणी केली.

सोंस यांच्यावर भाजपच्या नगरसेवकांकडून शाब्दिक हल्ला केला जात असताना आमदार गीता जैन यांनी सोंस यांची बाजू घेतली. दरम्यान पिठ्यासीन अधिकारी हसमुख गेहलोत यांनी आ. जैन यांना त्यांच्या प्रस्तावावर बोलण्यास सांगितले. इकडे गोंधळ सुरू असताना मेहता समर्थक नगरसेविका हेतल परमार, शानू गोहिल आदींनी आमदार जैन यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरवात केली. त्यावेळी आमदार जैन यांनी परमार यांना औकातमध्ये राहून बोला, असे सुनावले असता परमार यांनी आरडाओरडा करत आ. जैन यांच्या जागेकडे धावून गेल्या. त्यावेळी शिवसेना व काँग्रेसचे नगरसेवक आ. जैन यांच्या बाजूने सरसावले. गेहलोतदेखील डायसवरून परमार व अन्य नगरसेवकांना जागेवर जाऊन बसा, शांत रहा असे आवाहन करत होते. परमार या अंगावर आल्या म्हणून आ. जैन देखील त्यांच्या दिशेने प्रत्युत्तर द्यायला सरसावल्या असता सेना व काँग्रेस नगरसेवकांनी त्यांना आवरले.

शेवटी महिला सुरक्षा रक्षकांना पाचारण करण्यात आल्यावर त्यांनी परमार यांना धरून बाजूला केले. परमार या त्यांच्या जागेवरून बोलतानादेखील हातात बाटली नाचवत मोठ्याने बोलत होत्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in