काँग्रेसचे 'एकला चलो रे' ! BMC निवडणुकीसाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढवावी, अशी भावना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली असली तरी अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
काँग्रेसचे 'एकला चलो रे' ! BMC निवडणुकीसाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार
Photo : X (Harshwardhan Sapkal)
Published on

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढवावी, अशी भावना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली असली तरी अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मनसे महाविकास आघाडी सोबत आली तर पुढे काय नियोजन, याचा निर्णय महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते घेतील, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चैन्नीथला यांनी सांगितले.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू सोबत किंवा महाविकास आघाडी म्हणून एकत्र न लढता आपण स्वबळावर लढू, असा सूर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आळवला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड, भाई जगताप आदी नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तसेच टिळक भवनातही काँग्रेसच्या पोलिटिकल अफेअर्स कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीतही मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी, अशी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लावून धरली. मात्र याबाबत अद्याप कोणतीही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते योग्यवेळी निर्णय घेतील, असे चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

महायुती सरकारने राज्यातील शेतकरी, लाडकी बहीण, बेरोजगार यांची घोर फसवणूक केली आहे. शेतकरी संकटात असताना त्यांना भरीव मदत देण्याऐवजी जुन्याच योजनांचे एकत्रीकरण करून फसवे पॅकेज जाहीर केले आहे. लाडकी बहीण योजनेतून २१०० रुपये देण्यावर सरकार गप्प आहे. जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष आंदोलन, मोर्चे काढून सरकारला जाब विचारेल, असे ते म्हणाले.

मनसेसंदर्भात कोणतीही चर्चा नाही!

मनसेसंदर्भात काँग्रेस पक्षात कोणताही चर्चा झालेली नाही. मित्रपक्षांशीही यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे. परंतु आघाडी किंवा युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार दिले आहेत, असे चेन्नीथला यांनी सांगितले.

धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

राज्यातील जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे महायुती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून महाराष्ट्रातील सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षातील काही लोक करत आहेत. धार्मिक तेढ निर्माण करून महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द भंग करण्याचे षडयंत्र आहे परंतु मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काहीही बोलत नाहीत, असे चेन्नीथला म्हणाले.

निवडणूक आयोगाला आज शिष्टमंडळ भेटणार!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचे पुराव्यासह उघड केले पण निवडणूक आयोग त्यावर समाधानकारक उत्तर देत नाही. निवडणुकीतील घोटाळ्याप्रश्नी इतर राजकीय पक्षांनीही तक्रारी केल्या आहेत. याच प्रश्नावर मंगळवारी काँग्रेससह इतर राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) व शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in