काँग्रेसच्या मर्जीनेच मराठी महापौर; हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय की मराठी असा विवाद निर्माण केला जात असताना मुंबईचा महापौर मराठीच आणि काँग्रेसच्या मर्जीने होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेसच्या मर्जीनेच मराठी महापौर; हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा
PM
Published on

मुंबई : मुंबईचा महापौर उत्तर भारतीय की मराठी असा विवाद निर्माण केला जात असताना मुंबईचा महापौर मराठीच आणि काँग्रेसच्या मर्जीने होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले होते. मात्र होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकांच्या संख्येत दुपटीने वाढ होईल, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात सुरू असलेले राजकारण हे नैतिकतेला धरून नाही. महायुतीतील भाजपच्या मित्रपक्षांनी फडणवीस यांच्या विरोधात षडयंत्र रचले असून फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या दिल्लीत हालचाली सुरू असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी दैनिक ‘नवशक्ति’ व ‘फ्री प्रेस जर्नल’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पाणी, वाहतूककोंडी, झोपडपट्टी, भटके कुत्रे, कबुतरे, कचरा या आजच्या समस्या असून त्या समस्या सोडवण्याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. सत्ताधारी पक्षाने त्यांच्या कार्यकाळात कामाचे प्रगती पुस्तक जाहीर केले पाहिजे, असे आवाहन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांना केले आहे. मुंबई पालिकेत प्रशासक असून ९० हजार कोटींच्या ठेवी मोडल्याच, शिवाय १३ हजार कोटींचे कर्ज काढले, असा दावा त्यांनी यावेळी केला. राज्यातील महायुती सरकार मूलभूत प्रश्नापासून पळ काढत आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.

...म्हणून स्वबळावर लढतोय

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी काँग्रेस महाविकास आघाडी सोबत लढली. २८८ नगरपरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही काँग्रेस मविआसोबत काही ठिकाणी एकत्र होती. नगरपरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांची राष्ट्रवादी व ठाकरे सेना यांना एक अंकी आकडा गाठता आला. काँग्रेस दोन अंकावर पोहोचली. काँग्रेस स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर जागा अधिक येतील आणि विजयी होण्याची शक्यता अधिक आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

स्टार प्रचारक मुंबईत येणार

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मात्र मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे केंद्रीय नेतृत्व येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचार सभांमधून सत्तेतील भाजप-शिवसेना महायुतीवर निशाणा साधणार आहेत. तेलंगणचे अल्पसंख्यांक मंत्री व काँग्रेसचे नेते मोहम्मद अझरुद्दीन, इम्रान प्रताप गढी यांच्यासह देशातील अनेक प्रमुख नेते मुंबईत निवडणूक प्रचारासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले.

खरी लढाई २०२९ ला

नगरपरिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. चंद्रपूर, संगमनेरसह काही जिल्ह्यात काँग्रेसच्या जागा निवडून आल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत ही काँग्रेस मुसंडी मारेल. परंतु काँग्रेसची खरी लढाई २०२९ मध्ये असेल, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

१०० स्मार्ट सिटी गेल्या कुठे?

मुंबईतील वाहतूककोंडी, पाणी प्रश्न, कचरा, यामुळे पावसाळ्यात आजही मुंबईची तुंबई होते. भाजप नेत्यांनी १०० स्मार्ट सिटींची घोषणा केली होती त्याचे काय झाले, असा सवाल सपकाळ यांनी महायुती सरकारला विचारला आहे.

देवा भाऊ नव्हे, टक्का भाऊ !

देवेंद्र फडणवीस यांचा भ्रष्टाचार नसलेला एक तरी प्रोजेक्ट दाखवा. देवेंद्र भाऊ हे टक्का भाऊ आहेत, असा आरोप सपकाळ यांनी सोमवारी वार्तालापात केला.

logo
marathi.freepressjournal.in