मुंबई : नरेंद्र मोदींचे पंतप्रधानपद आणि लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मोदींनी २०२० मध्ये आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा काँग्रेसने या याचिकेत केला आहे. निवडणूक आयोगानेही सदरील प्रकरण अंशतः मान्य केल्याचा दावा चव्हाण यांनी केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. “आचारसंहितेचा भंग केल्याचे निवडणूक आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली, पण मोदींवर कारवाई केली नाही. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कठोर कारवाई करण्यात आली होती. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. मग नरेंद्र मोदींवर आयोग कारवाई का करत नाही? असा सवाल करत पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी आता निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर केलेल्या आरोप संदर्भातील पुरावे शोधले जाणार आहेत.