काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी जाहीर नाराज संजय निरूपम यांचाही समावेश

ठाकरे गटाने येथून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्याने निरूपम नाराज होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने या यादीत निरूपम यांना सामावून घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी जाहीर नाराज संजय निरूपम यांचाही समावेश

प्रतिनिधी/मुंबई

काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. यात महाविकास आघाडीत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे यांना सोडण्यावरून जोरदार टीकास्त्र सोडणारे मुंबई विभागीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांचा काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे. निरूपम हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. ठाकरे गटाने येथून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्याने निरूपम नाराज होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने या यादीत निरूपम यांना सामावून घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेसने मलोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. या यादीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आदींचा समावेश आहे.

अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, नसीम खान, अमित देशमुख, नितीन राऊत, वसंत पुरके, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कुमार केतकर, भालचंद्र मुणगेकर, कन्हैया कुमार आदींना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in