मुख्यमंत्र्यांकडून पटोलेंना महिन्याला १ खोका दिला जातो; 'या' काँग्रेस नेत्याने केले गंभीर आरोप

पुन्हा एकदा महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेसच्याच नेत्याने केले गंभीर आरोप
मुख्यमंत्र्यांकडून पटोलेंना महिन्याला १ खोका दिला जातो; 'या' काँग्रेस नेत्याने केले गंभीर आरोप

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदावर असलेले नाना पटोले हे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, "नाना पटोले हे सुद्धा लवकर गुवाहाटीला गेलेले दिसतील. त्यांना सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महिन्याला १ खोका दिला जातो." असा गंभीर आरोप त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

काँग्रेस पक्षाने आशिष देशमुख यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय समितीकडे यासंदर्भात अहवाल पाठवण्यात येणार असून वारंवार पक्षाच्या नेत्यांवर आरोप केल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, यावर बोलताना आशिष देशमुख म्हणाले की, "माझी वक्तव्ये ही पक्षविरोधी वक्तव्ये नाहीत तर मी पक्षाच्या हितासाठी वेळोवेळी भूमिका घेतली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कामासंदर्भात सर्व माहिती मी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडे ३ महिन्यांपूर्वी कानावर घातली. पण ही बाब त्यांनी तक्रारीच्या स्वरुपात घेतली की काय? मला माहिती नाही." असे स्पष्टीकरण दिले आहे.

"जर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझी तक्रार केली असेल, तर ते चुकीचे आहे. महाविकास आघाडीच्या सभेवेळी नाना पटोले हे गैरहजर होते तेव्हा आजारी असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर त्यांनी स्वतः स्पष्ट केले की, ते त्यावेळेस दिल्लीला होते. पण मला मिळालेल्या माहितीनुसार, ते सुरतच्या मार्गावर होते. आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, की सुरतच्या मार्गावर कोण असत? आता लवकरच ते गुवाहाटीला दिसतील." असा दावा कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in