मुंबई : राज्यातील २९ मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची दोन दिवसीय बैठक पार पडली असून निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेसंदर्भात स्वतंत्र चर्चा करण्यात येणार आहे. बुधवारपासून इच्छुक उमेदवारांच्या जिल्हा पातळीवर मुलाखती होणार असून त्यानंतर २५ व २६ डिसेंबर रोजी राज्य पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत उमेदवार निश्चित केले जातील. महानगरपालिका निवडणुकीतही आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला देण्यात आले आहेत. ज्या समविचारी पक्षांचे आघाडीसाठी प्रस्ताव येतील त्यावर निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीसाठी दोन दिवस टिळक भवन येथे बैठक पार पडली. यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस गुरविंदरसिंग बच्चर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
नॅशनल हेराल्डप्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा आहे. केवळ सोनिया गांधी व राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी रचलेले एक कुभांड असल्याचे उघड झाले. ईडीसारख्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा भाजपचा अजेंडा आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
नॅशनल हेराल्ड स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी ब्रिटिशांविरोधात लढताना एक अजेंडा चालवण्यासाठी देशप्रेमातून स्थापन केली. या संस्थेच्या स्थापनेसाठी स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतः पैसे दिले होते. ही संस्था एक वर्तमानपत्र चालवत होती व ना नफा तत्त्वावर या संस्थेचे काम चालत होते व आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या संस्थेत काम करणाऱ्या पत्रकार, कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचा प्रश्न उद्भवला तेव्हा काही व्यवहार झाले, पण त्यातून कोणत्याही सभासदाला लाभांश वगैरे आर्थिक लाभ झालेला नाही. पण मनीलाँड्रिंग झाल्याचा आरोप करत भाजपने खोटे गुन्हे दाखल करण्यास तपास यंत्रणाना भाग पाडले. सोनियाजी व राहुलजी यांना तासन्तास चौकशीच्या नावाखाली त्रास देण्यात आला. भाजपचा खोटेपणा उघड झाला आहे, असेही सपकाळ म्हणाले.
मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा झाली. या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे यांची युती असणार आहे. पण अजित पवारांचा पक्ष नसणार, हा महायुतीचा डाव आहे. सत्तेचा मलिदा खाताना अजित पवारांचा पक्ष चालतो, पण निवडणुकीत काँग्रेसच्या सेक्युलर मतांचे विभाजन करण्यासाठी अजित पवार यांचा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार ही महायुतीची रणनीती आहे, हे जनतेला समजते, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री करायचे त्यांच्याबरोबर चहा-नाश्ता करायचा आणि निवडणूक आली की नवाब मलिक यांचा मुद्दा पुढे करून युतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला दूर ठेवायचे हा दुटप्पीपणा आहे. निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्दा पुढे करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला जवळ करायचे आणि मतांचे विभाजन करण्यासाठी अजित पवार यांना स्वतंत्र निवडणूक लढवायला लावायची, महायुतीचे हे राजकारण लपून राहिलेले नाही. हिंदू विरुद्ध मुस्लिम केल्याशिवाय भाजप निवडणुका जिंकू शकत नाही म्हणून निवडणुका आल्या की हा वाद निर्माण केला जातो, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली
ब्रह्मपुरी येथील शेतकरी शिवदास कुडे याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याप्रकरणी पोलिसांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केल्याचे विजय वडेट्टीवर यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण समजल्यावर त्या शेतकऱ्याला मदत केली असून त्याला न्याय मिळावा म्हणून पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.