काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी; भाजपकडून पूनम महाजन, शेलार की साटम?

मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा आणि धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता...
काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी; भाजपकडून पूनम महाजन, शेलार की साटम?
Published on

मुंबई : मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा आणि धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता उत्तर-मध्य मुंबईतील महाविकासआघाडीचा उमेदवारीचा घोळ मिटला आहे. आधी दक्षिण-मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, हा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. ती आता दूर झाली आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला मुंबईतील उत्तर आणि उत्तर-मध्य या दोन जागा आल्या आहेत. काँग्रेसकडून या दोन जागांसाठी उमेदवारांचा शोध सुरू होता. यापैकी उत्तर-मध्यमधून काँग्रेसचे आमदार भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, हायकमांडने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसला अजून उत्तर मुंबईच्या उमदेवाराची प्रतीक्षा आहे.

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि कालिना या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी चार आमदार महायुतीचे आहेत. तर वांद्रे पूर्वचे आमदार हे काँग्रेस पक्षातून जवळपास बाहेर पडल्यासारखे आहेत. कालिनामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय पोतनीस हे आमदार आहेत. त्यामुळे वर्षा गायकवाड यांना या मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या विरोधात मेहनत घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, उत्तर-मध्य मुंबईतून भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. येथून भाजपच्या मावळत्या खासदार पूनम महाजन यांच्यासह आशीष शेलार,अमित साटम यांच्या नावाची चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in