

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने सोमवारी ८७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी सर्वंच राजकीय पक्षांनी खबरदारी घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस बाकी असतानाही भाजप, शिंदे सेना, ठाकरे सेना, मनसेने कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र, मुंबई काँग्रेसने वंचितबरोबर हातमिळवणी करत बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर केली. ‘निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. आपली मुंबई घडवूया, मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया’, असे म्हणत काँग्रेसने अधिकृतपणे ट्विटर हँडलवरुन उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्या ७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
चंद्रकांत हडोरे यांच्या मुलीला उमेदवारी
काँग्रेसने सोमवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये खासदार चंद्रकांत हंडोरे यांची मुलगी प्रज्योती हंडोरे यांना प्रभाग क्रमांक १४० मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अस्लम शेख यांच्या मुलाला व बहिणीला तिकीट
आमदार अस्लम शेख यांचा मुलगा आणि बहिणीलादेखील काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. सोमवारी रात्री ‘एबी फॉर्म’ देण्यात येणार असून, मंगळवारी काँग्रेसचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.