आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप

राज्यसभेप्रमाणे सोमवारी विधान परिषदेसाठीही २८५ आमदारांनी मतदान केले
आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप

विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार चुरस होती. एकेक मत महत्वाचे असल्याने भाजपने राज्यसभेप्रमाणेच आपले आजारी आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे विधान भवनात मतदानाला येतील, याची व्यवस्था केली होती. त्यानुसार दोघांनीही मतदान केले; मात्र काँग्रेसने या दोघांच्या मतदानावर आक्षेप घेतल्याने मतमोजणी काही काळासाठी रेंगाळली होती. एकूण २८५ आमदारांनी मतदान केले. सर्व मते वैध ठरली.

राज्यसभेप्रमाणे सोमवारी विधान परिषदेसाठीही २८५ आमदारांनी मतदान केले. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे विधानसभेतील एक जागा रिक्त आहे. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे मतदानाची वेळ संपली तेव्हा २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सर्वप्रथम मतदान केले. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर हे गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत होते. त्यामुळे त्यांच्या मतदानाबद्दल साशंकता होती. मात्र, क्षितीज ठाकूर यांनी दुपारी विधानभवनात येऊन मतदान केले.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी सहायकाच्या मदतीने मतदान करून गोपनीयतेचा भंग केल्याचा आक्षेप काँग्रेसने घेतल्याने मतमोजणी रेंगाळली. राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावल्यानंतर काँग्रेसने भारत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतमोजणीसाठी आयोगाच्या आदेशाची वाट पहावी लागली. निवडणूक अधीनियमानुसार मतदार हा अंध, अशिक्षित किंवा वृद्धापकाळामुळे मतदान करण्यास असमर्थ असेल तर १८ वर्षावरील वाचू शकेल अशा व्यक्तीची मतदानासाठी मदत घेता येते; पण इथे अशी परिस्थिती नाही. मतदारांनी स्वतः सही करुन मतपत्रिका घेतली होती. त्यामुळे त्यांचे मत बाद केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली होती. तर जगताप आणि टिळक या दोघांना मतदान करण्यासाठी सहायक मिळावा म्हणून निवडणूक आयोगाकडून रितसर परवानगी घेण्यात आली होती, असा खुलासा भाजपने केला आहे.

आघाडी व भाजपचे नेते विधान भवनात ठाण मांडून

ही निवडणूक आघाडी तसेच भाजपसाठी अतिशय महत्वाची असल्याने आघाडी तसेच भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांनी विधान भवनात ठाण मांडले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान भवनातून शिवसेना उमेदवारांना होणाऱ्या मतदानाबाबत सूचना करत होते. काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मतदानाविषयी सातत्याने आमदारांच्या संपर्कात होते.

राज्यसभा निवडणुकीत आघाडीला पराभवाचा झटका देणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मतदान पूर्ण होईपर्यंत विधान भवनात ठाण मांडून होते. ते स्वतः मतदानासाठी जाणाऱ्या भाजप आमदाराना मार्गदर्शन करत होते. मतदान पार पडल्यानंतर फडणवीस विधान भवनातून बाहेर पडले. फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन, आशीष शेलार हे भाजपच्या मतदानाचे व्यवस्थापन करत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in