काँग्रेसची १६ ऑगस्टपासून पदयात्रा नाना पटोले महाराष्ट्र पिंजून काढणार

ही पदयात्रा झाल्यानंतर बसयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला जाणार आहे.
काँग्रेसची १६ ऑगस्टपासून पदयात्रा नाना पटोले महाराष्ट्र पिंजून काढणार

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरू होत असताना प्रदेश काँग्रेसचे नेते पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. राज्यात १६ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान पदयात्रा निघेल. राज्यातील सर्व विभागांत पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

राज्यातील सहा विभागांत पदयात्रा काढण्यात येणार असून, नागपूर विभागातील पदयात्रेचे नेतृत्व मी करणार आहे. अमरावती विभागात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उत्तर महाराष्ट्रात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. कोकण विभागात सर्व नेते एकत्र येऊन पदयात्रा काढतील. या पदयात्रेचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.

ही पदयात्रा झाल्यानंतर बसयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला जाणार आहे. भाजप सरकारने जनतेला खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. शेतकरी, कामगार, गरीब, कष्टकरी जनता, तरुणवर्ग, महिलांचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था अशा सर्व आघाड्यांवर केंद्र तसेच राज्यातील भाजप सरकार अपयशी ठरले आहे. भाजप जाती-धर्मात भांडणे लावून राजकीय पोळी भाजत आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून आपल्या मित्रोंसाठी भाजप सरकार काम करत आहे. यात्रेवेळी सभांच्या माध्यमातून हे सर्व मुद्दे जनतेच्या समोर मांडले जाणार आहेत, असे पटोले म्हणाले.

राहुल गांधींचा मुंबईत भव्य सत्कार

दरम्यान, राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यात मोठा उत्साह संचारला आहे. राहुल गांधी हे न डगमगता केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल करत असल्याने भाजपने षड‌्यंत्र रचून त्यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न केला. देशातील हुकूमशाही सरकारविरोधात लढणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा झाली आहे. राहुल गांधी यांचा मुंबईत भव्य सत्कार करण्याचा प्रदेश काँग्रेसचा विचार असून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री नसीम खान यांनी यासंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी दिल्लीत चर्चा केली आहे. तसेच प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी यांना सत्काराचे निमंत्रण दिले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in