पारशी धर्मीयांना आरक्षण हवे काँग्रेसच्या पारशी नेत्याची मागणी

आम्ही कधीही आरक्षणाची मागणी केली नाही. मात्र, पूर्वी सर्वांचा स्तर समान होता. सध्या अनेक समाजांकडून आरक्षणाची मागणी वाढली आहे.
पारशी धर्मीयांना आरक्षण हवे काँग्रेसच्या पारशी नेत्याची मागणी

मुंबई : देशात जात-धर्मावरून नोकरी व शिक्षणात आरक्षणाची मागणी वाढलेली असतानाच अत्यंत अल्पसंख्य असलेल्या पारशी समाजानेही आरक्षणाची मागणी केली आहे. अ. भा. काँग्रेस समितीचे पारशी-झोराष्ट्रीयन समाजाचे राष्ट्रीय नेते होशेदार एल्विया यांनीही पारशी समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आमचा धर्म अत्यंत अल्पसंख्य आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षणाचे लाभ मिळायला हवेत, असे ते म्हणाले.

कुलाबाच्या खुस्रो बाग येथील रहिवासी असलेले एल्विया हे सध्या काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे उप समन्वयक आहेत. दक्षिण मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस असलेले एल्विया यांची राष्ट्रीय समितीवर निवड झाली.

ते म्हणाले की, पारशी-झोराष्ट्रीयन तरुण मोठ्या संख्येने देश सोडत आहेत. कारण भारतात शिक्षण व नोकऱ्यांच्या पुरेशा संधी नाहीत. मी अल्पसंख्याकांसाठी काम करणार आहे. विशेषत: पारशी-झोराष्ट्रीयन समाजासाठी.

पारशी धर्मीयांनी कधीही आरक्षण मागितले नाही. कारण पारशी हे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहेत. टीआयएफआर, टीआयएसएस व टाटा मेमोरियल सेंटर आदी जगविख्यात संस्था या पारशी उद्योजक कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या आहेत.

आम्ही कधीही आरक्षणाची मागणी केली नाही. मात्र, पूर्वी सर्वांचा स्तर समान होता. सध्या अनेक समाजांकडून आरक्षणाची मागणी वाढली आहे. मराठा, मुस्लीम हे आरक्षण मागत आहेत. आमच्या धर्माच्या विद्यार्थ्यांना शाळेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळतात, परंतु त्यांना प्रवेश नाकारला जातो. त्यामुळे पारशी लोक परदेशात जात आहेत. ते हुशार असल्याने त्याचा फायदा देशाला किंवा समाजाला होत नाही, असे त्यांनी सांगितले.

एल्विया यांनी आंतरराष्ट्रीय विमान कंपनीत मालवाहतूक क्षेत्रातील प्रमुखपद सांभाळले आहे. ते म्हणाले की, मला एकच मुलगा आहे. त्याला आता कॅनडाचे नागरिकत्व मिळाले आहे. तो आता तेथील चांगल्या शिक्षणसंस्थेत शिकत आहे. एल्विया हे सामाजिक कार्य करत असून ज्येष्ठ नागरिकांबाबत ते काम करतात. मुंबईच्या राजकारणात पुन्हा पारशी व्यक्ती सक्रिय झाला आहे. यापूर्वी सर फिरोजशहा मेहता यांसारखे बडे राजकारणी मुंबई मनपाचे सदस्य होते. त्यानंतर पारशी धर्मीय मुंबईच्या राजकारणातून हळूहळू कमी झाले. या समाजातील सर्वात मोठा राजकारणी म्हणजे मर्झबान पत्रावाला. ते १९९० ला कुलाब्याचे आमदार होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in