नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने विरोधक आक्रमक; मुंबईत काँग्रेसचे आंदोलन तर संजय राऊत यांची टीका

काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद केल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. निवडणूक आयोग भाजप सरकारच्या हातातले कळसूत्री बाहुले बनले असून सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने बुधवारी दादरच्या टिळक भवन येथे जोरदार आंदोलन करून निवडणूक आयोगाचा निषेध केला.
नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने विरोधक आक्रमक; मुंबईत काँग्रेसचे आंदोलन तर संजय राऊत यांची टीका
Photo : X (INCHarshsapkal)
Published on

मुंबई : काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद केल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. निवडणूक आयोग भाजप सरकारच्या हातातले कळसूत्री बाहुले बनले असून सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने बुधवारी दादरच्या टिळक भवन येथे जोरदार आंदोलन करून निवडणूक आयोगाचा निषेध केला.

शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज राजकीय दबावापोटी बाद करण्यात आला असून संसदेत ‘नारी वंदना’ विधेयक आणायचे आणि दुसरीकडे विरोधी पक्षातील कर्तृत्ववान महिला नेत्यांचे खोट्या कारणांवरून अर्ज रद्द करायचे हाच का नारी सन्मान, असा सवाल उपस्थित केला आहे.

काँग्रेसची नटराजन यांना निवडून आणण्याची पूर्ण ताकद असताना केवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. अर्जात एक गुन्हा लपवल्याचे कारण पुढे करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात तेलंगणामधील एका प्रकरणात त्यांना केवळ एक नोटीस देण्यात आली होती, कोणताही एफआयआर दाखल नव्हता.

झारखंडमध्ये भाजपपुरस्कृत उमेदवार परिमल नाथवानी यांच्या अर्जात त्रूटी आढळल्या, तेव्हा त्यांना त्या दुरुस्त करण्यासाठी २४ तासांची मुदत दिली गेली. मग एका महिलेच्या बाबतीत हा वेगळा निमय का, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिज दत्त, राणी अग्रवाल, जोजो थॉमस, प्रकाश सोनावणे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

निवडणूक आयोग, सरकारविरोधात घोषणाबाजी

काँग्रेसनेही निवडणूक आयोग आणि भाजप सरकारविरोधात तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त केला. यावेळी निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, मोदी सरकार, फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. निवडणूक आयोग आणि भाजपने लोकशाहीचा गळा दाबण्याचे कृत्य केले असून यामुळे निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कार्यपद्धतीचा पर्दाफाश झाला आहे. काँग्रेस पक्ष या लोकशाहीविरोधी शक्तींच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढा देत राहील, असा इशारा सपकाळ यांनी यावेळी दिला.

logo
marathi.freepressjournal.in