काँक्रिटीकरण फेरनिविदेवर काँग्रेसचा प्रश्नचिन्ह; आदित्य ठाकरेंच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक

शहर भागातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे रखडवणार्या मे. रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा. लि. या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आल्यानंतर पालिकेने नव्याने निविदा मागवली आहे
काँक्रिटीकरण फेरनिविदेवर काँग्रेसचा प्रश्नचिन्ह;
आदित्य ठाकरेंच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक

मुंबई : शहरातील सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवण्यासाठी मुंबई महापालिकेने याआधी १,६७० कोटींच्या निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. परंतु कंत्राटदाराने पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, यंदा ३०० कोटींनी कंत्राट रक्कम कमी केली आहे का, असा सवाल मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी ही काही दिवसांपूर्वी हाच मुद्दा उपस्थित करत आयुक्तांच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या आरोपानंतर काँग्रेस ही आक्रमक झाली आहे.

शहर भागातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे रखडवणार्या मे. रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा. लि. या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आल्यानंतर पालिकेने नव्याने निविदा मागवली आहे. १,३६२ कोटी ३४ लाख रुपये खर्चाची ही निविदा असून, शहरातील सुमारे २०० हून अधिक रस्तेकामे या अंतर्गत होणार आहेत. या आधीची निविदा ही १६०० कोटींची होती. नवीन निविदेत ३०० कोटींनी खर्च कमी करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना विचारणा केल्यानंतर आता काँग्रेसनेही पालिकेवर निशाणा साधला आहे. आधीची निविदा १६७० कोटींची होती. नवीन निविदा १३६२ कोटींची आहे. अचानक ३०० कोटींनी खर्च कमी कसा होऊ शकतो, असा सवाल करत रवी राजा यांनी पालिकेने आपल्या मर्जीतील कंत्राटदारांनाच निविदा भरता याव्यात म्हणून निविदांची किंमत कमी करण्यात आली आहे का, असा सवाल उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in