वाढत्या प्रकल्प खर्चावर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह

पालिकेच्या मुदत ठेवीत गेल्या वर्षभरात आठ हजार कोटींची घट झाली आहे. हे चिंताजनक आहे.
वाढत्या प्रकल्प खर्चावर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह

मुंबई : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात येत असून अनेक प्रकल्प काम सुरू होण्याआधीच महागले आहेत. ऑरेंज गेट ते ग्रँट रोड उन्नत मार्ग, वरळीतील भूमिगत पार्किंग या प्रकल्पांच्या वाढीव खर्चावरून काँग्रेसने पालिकेच्या कारभारावर सवाल उपस्थित केला आहे. पाच महिन्यांत प्रकल्प खर्च दुप्पट झाला असून, ही निव्वळ मुंबईकरांच्या पैशाची उधळ आहे. कंत्राटदारासाठी पालिकेचे तिजोरीचे दरवाजे उघडले असून, वाढीव खर्चाबाबत पालिकेने योग्य ते स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी केली आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने ऑरेंज गेट ते ग्रँट रोड उन्नत मार्गासाठी पुन्हा नवीन काढले आहे. या आधी निविदा काढून ते रद्द केले होते. हा प्रस्ताव आणला तेव्हा त्याचा खर्च ६३८ कोटी इतका होता. वर्षभरात वाढून १,१७० कोटी झाला आहे. अवघ्या ६ महिन्यांत एखाद्या प्रकल्पाची किंमत इतकी कशी वाढते, असा सवाल पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. प्रशासन यासाठी महागाईचे कारण देत आहे. वरळीतील भूमिगत पार्किंग प्रकल्पाचा खर्च ८ महिन्यात १६५ कोटींवरून २१६ कोटी झाला आहे.

८ महिन्यात ५१ कोटींनी प्रकल्प खर्च कसा वाढतो? पालिका प्रशासन याला महागाईचे कारण देत आहे. म्हणजे पालिकेच्या म्हणण्यानुसार ८ महिन्यात ३१ टक्क्यांनी महागाई वाढली, तर केंद्र सरकार महागाई निर्देशांक ५.४६ टक्के इतका असल्याचे म्हणते आहे. पालिका प्रशासन अवघ्या काही महिन्यांत महागाई दुप्पट झाली आहे, म्हणते तेव्हा प्रकल्प खर्चात ती कशी वाढली, याची माहितीही मुंबईकरांना देणे बंधनकारक आहे. हा मुंबईकरांचा पैसा असून, त्याचा हिशेब मिळायलाच हवा, असे राजा यांनी म्हटले आहे.

बेलगाम कारभारावर निर्बंध आवश्यक

पालिकेच्या मुदत ठेवीत गेल्या वर्षभरात आठ हजार कोटींची घट झाली आहे. हे चिंताजनक आहे. पालिकेकडे सध्या उत्पन्नाचा स्रोत नाही. त्यामुळे विकासकामांसाठी ठेवी मोडल्या जात आहेत. त्यात प्रकल्पांचा खर्च दर सहा महिन्यांत वाढत असल्यामुळे ठेवी मोडण्याचे प्रमाण अधिक आहे. पालिकेत नगरसेवक नसल्यामुळे प्रशासनाला जाब विचारणारे कोणी नाही. त्यामुळे प्रशासनाचा बेलगाम कारभार सुरू आहे. यावर निर्बंध आणायला हवेत, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in