मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या तलाठी भरती घोटाळ्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी दादर रेल्वे स्थानकात रुळांवर उतरत लोकल ट्रेन रोखून धरली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशी करून घोटाळ्यामागील मास्टरमाईंड शोधा, अशी प्रमुख मागणी करत कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे रेल्वेगाड्यांना उशीर होत असल्याने अखेर रेल्वे पोलिसांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना ताब्यात घेतले.
रुळांवर मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उतरल्याने पश्चिम रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. संध्याकाळच्या सुमारास कार्यालयातून घरी जाणाऱ्या मुंबईकरांना या आंदोलनाचा फटका बसला. या आंदोलनामुळे साधारण बराच काळ रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले होते. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बोरिवली धीम्या लोकलची चेन खेचून आंदोलन सुरू केले. त्यानंतर आंदोलक रेल्वे रुळांवर उतरून शिंदे-फडणवीस- अजित पवार सरकारविरोधात घोषणा देत होते. तसेच तलाठी भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केली.
राज्यात तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे मागितले जात आहेत. एवढेच नाही तर आम्ही पुरावे दिल्यानंतरही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आम्हाला रेल्वे रोको करून सरकारचे लक्ष वेधून घ्यावे लागल्याचे कुणाल राऊत यांनी सांगितले. युवक काँग्रेसने तब्बल १८ मिनिटे बोरिवली लोकल रोखून धरली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करायचे, यासंदर्भात बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.