पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल!
नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ
पाचपैकी चार राज्यांतील निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार असल्याचे भाकित केले जात आहे. शिवाय, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे भाजपकडून बाहेर काढले जात आहेत. असे असताना आता नाना पटोले यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेस मिळवणार आणि पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाना पटोले यांनी ट्विटद्वारे हा दावा केला आहे. या अगोदरदेखील अनेकदा नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केल्याने विविध चर्चा रंगल्या होत्या. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरीदेखील स्थानिक निवडणुकात काँग्रेसने स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेतलेला आहे.
दरम्यान, केंद्रात सत्तेचा दुरुपयोग करून भाजपने ब्लॅकमेलिंगचे राजकारण चालविले आहे. काँग्रेससह सर्व विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्यामागे ईडी, सीबीआयची चौकशी लावायची आणि विरोधकांना जेरीला आणायचे, हीच मोदी सरकारची सूडभावनेची कार्यसंस्कृती राहिली आहे. जे विरोधक शरण येणार नाहीत, त्यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा लावायचा आणि तरीही विरोधक शरण येत नसतील तर त्यांच्या ताब्यातील राज्य सरकार पाडण्याचे कट कारस्थान रचण्यात येते, असे नाना पटोले यांनी काल सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले.