मुंबईत काँग्रेसचे ‘उत्तर भारतीय कार्ड’भाजपचा सुपडा साफ होणार -अजय राय

केंद्रातील मोदी सरकार निवडून आलेले सरकार पैशांच्या बळावर पाडते आणि लोकांना ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून आपल्या बाजूला आणते.
मुंबईत काँग्रेसचे ‘उत्तर भारतीय कार्ड’भाजपचा सुपडा साफ होणार -अजय राय

मुंबई : मुंबईत राहणारे उत्तर भारतीय समाजाचे लोक मग ते उत्तर प्रदेशचे असोत किंवा बिहारचे. मुंबईच्या विकासात उत्तर भारतीय समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजाचे काँग्रेस पक्षाशी जुने नाते आहे. उत्तर भारतीय समाज हा लढणारा समाज असून काँग्रेस पक्षही लढणारा आहे. हा समाज मोठ्या संख्येने काँग्रेसशी जोडला जात आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा सुपडा साफ होणार हे निश्चित आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजप पूर्णपणे अपयशी होणार आहे, असे विधान उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी मुंबईत केले. दरम्यान, उत्तर भारतीय समाजातील ओबीसी वर्गाला महाराष्ट्रात ओबीसीचा दर्जा मिळत नाही, हा अन्याय आहे, असे काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम म्हणाले.

केंद्रातील मोदी सरकार निवडून आलेले सरकार पैशांच्या बळावर पाडते आणि लोकांना ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून आपल्या बाजूला आणते. आज देशातील सर्वसामान्य जनता महागाईने हैराण झाली आहे. उपजीविकेची सर्व साधने बंद होत आहेत. मात्र मोदी सरकार देशात धर्माच्या नावावर राजकारण करण्यात व्यस्त आहे. भाजपने जनतेचा विश्वास पूर्णपणे गमावला आहे. काँग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस आणि उत्तर भारतीय सभातर्फे मुंबईमध्ये ‘उत्तर भारतीय सामाजिक सांस्कृतिक संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रमुख अतिथी म्हणून राय बोलत होते.

या उत्तर भारतीय सामजिक सांस्कृतिक संमेलनामध्ये अजय राय यांच्यासोबत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, संमेलनाचे आयोजक माजी खासदार संजय निरूपम, आमदार कपिल पाटील, संत ओमदास महाराज, उत्तर पश्चिम मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि उत्तर भारतीय समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संमेलनामध्ये उत्तर भारतीय समाजाच्या ज्वलंत मुद्द्यांवर चार प्रस्ताव ठेवण्यात आले आणि सर्वानुमते पारित करण्यात आले.

भविष्यात रस्त्यावर उतरू!

उत्तर भारतीय समाजाचे हे सर्व चारही प्रस्ताव घेऊन काँग्रेसचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. तसेच वेळ पडल्यास या मागण्यांसाठी भविष्यात रस्त्यावर उतरू आणि तीव्र आंदोलन करू, असा गर्भित इशारा संजय निरूपम यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in