
महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत त्यांच्या अखत्यारित असलेल्या भूखंडावर नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवताना जैवविविधतेचे संवर्धन होईल, अशा प्रकारे शहरातील विविध उद्यानांचा विकास, त्यामध्ये राबवलेल्या वेगवेगळ्या संकल्पना जसे की सुगंधी उद्यान, पाम उद्यान, गुलाब उद्यान, मीयावकी पद्धतीचे उद्यान, अशा अनेक नावीन्यपूर्ण योजना उद्यान विभाग राबवत आहे.
महानगरपालिकेच्या २४ प्रभागांमध्ये रोपवाटिका असून त्यामध्ये वेगवेगळ्या तसेच दुर्मीळ प्रजातींच्या वृक्षांचे जतन व संवर्धन केले जाते. परिणामी, मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही आपल्याला सहज जैवविविधतेचे दर्शन घडते. विविध प्रजातींची रंगबिरंगी फुलपाखरे, अनेक प्रकारचे कीटक, विविध प्रजातीच्या पक्ष्यांचा वावर आपणास कुठल्याही उद्यानात फेरफटका मारल्यास सहज दृष्टीस पडतो, अशी माहिती उद्यान विभागप्रमुख, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. मानवी हस्तक्षेपामुळे या धरतीवरील जैवविविधता धोक्यात आली आहे. तिचे संवर्धन व जतन करणे आवश्यक आहे, याबाबत विश्वामध्ये जागृतता निर्माण करण्याचे हेतूने २२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभाग हा नेहमीच जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अग्रेसर असतो.