शिवडीचा विकास पाहता ५० मीटर क्षमतेचे पंप घ्या!

एफ-दक्षिण विभागात गोलंजी हिल जलाशयासाठी २ पाण्याचे पंप बदलण्यासाठी जल अभियंता विभागाद्वारे निविदा प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. या निविदानुसार आता सध्या स्थितीत असलेल्या ३० मीटर क्षमतेचे पंप जल विभाग विकत घेणार आहे.
शिवडीचा विकास पाहता ५० मीटर क्षमतेचे पंप घ्या!
Published on

मुंबई : शिवडीचा विकास झपाट्याने होत असताना जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा करणारे पंप ५० मीटर क्षमतेचे असणे गरजेचे आहे. त्यामुळे ३० मीटर क्षमतेचे पंप टाकण्यासाठी निविदा प्रक्रिया रद्द करा आणि नव्याने निविदा प्रक्रिया राबवा, अशी मागणी करणारे पत्र मुंबई महापालिकेला दिल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले.

एफ-दक्षिण विभागात गोलंजी हिल जलाशयासाठी २ पाण्याचे पंप बदलण्यासाठी जल अभियंता विभागाद्वारे निविदा प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. या निविदानुसार आता सध्या स्थितीत असलेल्या ३० मीटर क्षमतेचे पंप जल विभाग विकत घेणार आहे. परंतु गोलंजी हिल जलाशयातून एफ दक्षिण विभागातील प्रभाग क्रमांक २०१, २०२, २०३, २०४, २०५, २०६ आदी प्रभागामधील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. नायगाव विभागातील बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम म्हाडाच्या वतीने चालू करण्यात आले आहे. या विभागात भविष्यात मोठ्या प्रमाणात पुनर्विकास होणार आहे. येथे राहणाऱ्या हजारो रहिवाशांना पुनर्विकास झाल्यावर ५०० फुटाची सदनिका मिळणार आहे. तसेच इतर प्रभागात ही झोपडपट्ट्यांचे एसआरएमार्फत पुनर्विकासाचे काम चालू आहे. त्यामुळे भविष्यात या विभागातील नागरिकांकडून पिण्याच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढणार आहे. या विभागाचा भविष्यात मोठ्या प्रमाणात होणारा पुनर्विकास लक्षात घेता, ५० मीटरपेक्षा जास्त क्षमतेचे पंप बसविणे आवश्यक आहे. सध्या ३० मीटर क्षमतेच्या पंपाच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून नवीन निविदा काढल्यास महानगरपालिकेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, तसेच विभागातील नागरिकांना पाणीपुरवठा देखील सुरळीत होईल, याकडे पडवळ यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

logo
marathi.freepressjournal.in