
मुंबई : काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केलेले आमदार झिशान सिद्दीकी यांचा अंगरक्षक पोलीस हवालदार विशाल अशोक ठाणगे याला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी अलीकडेच सिद्धीकी हाऊसला अचानक भेट दिल्यानंतर विशाल गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा आमदार मुलगा झिशान सिद्दीकी याच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे त्याला मुंबई पोलिसाकडून सुरक्षा पुरविण्यात आली आहे. यावेळी पोलीस हवालदार विशाल ठाणगे याला तिथे बंदोबस्ताकामी ठेवण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध झिशान सिद्दीकी यांनी पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांच्याकडे तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर त्यांनी अचानक सिद्दीकी हाऊसला भेट दिली. यावेळी तिथे विशाल ठाणगे उपस्थित नव्हता. तो तेथून गायब झाला होता. या हलगर्जीपणाचा त्यांनी गंभीर दखल घेत त्याला पोलीस सेवेतून निलंबित केले. तसेच त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई ठरविली जाणार आहे.