मुंबई : राज्य राखीव पोलीस दलाचे हवालदार व्यंकट मारुती पडळवार (४०) गोळीबारात जखमी झाले. हातातील रायफलमधून गोळी सुटल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आजारामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी मालाड पोलीस तपास करत आहेत.
संभाजीनगरचे रहिवाशी असलेले व्यंकट हे त्यांच्या पत्नी, एक मुलगा आणि व मुलीसोबत राहतात. सध्या ते राज्य राखीव पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांची नेमणूक मालाड रेल्वे स्थानकाजवळील द मॉलजवळ होती. सोमवारी त्यांच्या हातातील एलएलआयमधून एक गोळी सुटून ते जखमी झाले. ही गोळी त्यांच्या हाताला लागून आरपार निघून गेली होती. हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना लक्षात येताच त्यांनी त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी आडाणे यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. प्राथमिक तपासात व्यंकट हे आजारी असून, त्यांना गेल्या तीन वर्षांपासून सिजोफेनिकयाचा त्रास होता. या आजाराला ते कंटाळून गेले होते. त्यातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. ही माहिती त्यांच्या संभाजीनगर येथे राहणाऱ्या कुटुंबीयांसह नातेवाईकांना कळविण्यात आली आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी अपघाताची नोंद करुन तपास सुरू केला आहे. व्यंकट यांची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर या घटनेमागील कारणाचा अधिकृतपणे खुलासा होईल, असे पोलिसांकडून सांगणयात आले.