फसवणुकीच्या गुन्ह्यांतील बांधकाम व्यावसायिकाला अटक

गेल्या पाच वर्षांत त्यांनी गुंतवणुक केलेली रक्कम परत केली नाही
फसवणुकीच्या गुन्ह्यांतील बांधकाम व्यावसायिकाला अटक

मुंबई : फसवणुकीच्या गुन्ह्यांतील बांधकाम व्यावसायिकाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. विपुल हिम्मतलाल शाह असे या आरोपी व्यावसायिकाचे नाव असून गुंतवणुकीसह फ्लॅटच्या आमिषाने सव्वादोन कोटीची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कापड व्यापारी असलेले तक्रारदार बोरिवली परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. विुल शाह आणि मुरारी शाह हे दोघेही बांधकाम व्यावसायिक असून ते दोघेही त्यांच्या परिचित आहेत. त्यांच्यात चांगली मैत्री होती. या दोन्ही आरोपींचे बोरिवली परिसरात एका इमारतीचे प्रोजेक्ट सुरु होते. त्यात त्यांनी गुंतवणुक केल्यास चांगला परतावा तसेच फ्लॅट देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

दोन्ही आरोपींना ते २७ वर्षांपासून ओळखत असल्याने त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना गुंतवणुक म्हणून त्यांना सव्वादोन कोटी रुपये दिले होते. या गुंतवणुक रक्कमेवर त्यांना सप्टेंबर २०१७ पर्यंत नियमित व्याज मिळत होते. मात्र नंतर त्यांनी व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरु केली होती. गुंतवणुक रक्कमेची मागणी केल्यानंतर त्यांनी पैसे देण्यास नकार देताना त्यांच्या बोरिवलीतील गोकुळ ड्रिममध्ये फ्लॅट देण्याचे आश्‍वासन दिले. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना फ्लॅटसह कार पार्किंगचे अलोटमेंट दिले. मात्र फ्लॅटचा ताबा दिला नाही. याच दरम्यान एका याचिकेवर सुनावणी देताना मुंबई उच्च न्यायालयाने मुरारी शहा आणि विपुल शहा यांना गोकुळ ड्रिम या प्रोजेक्टमधून टर्मिनेट करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्यांच्याकडून फ्लॅट मिळण्याची शक्यता कमी होती. फ्लॅटचा ताबा मिळत नसल्याने त्यांनी त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र गेल्या पाच वर्षांत त्यांनी गुंतवणुक केलेली रक्कम परत केली नाही.

अशा प्रकारे या दोघांनी गुंतवणुकीच्या नावाने मनोज शहा यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांची सव्वादोन कोटी रुपयांची फसवणुक केली होती. त्यामुळे या सर्वांनी बोरिवली पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर विपुल आणि मुरारी यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या विपुल शहा याला दहा महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in