भायखळा, बोरिवली भागात बांधकाम बंदी; हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी BMC चा निर्णय

भायखळा आणि बोरिवली पूर्व या भागांतील हवेचा गुणवत्तेचा निर्देशांक सतत २००च्या वर राहिल्यामुळे या ठिकाणांवरील बांधकाम येत्या २४ तासांकरिता नोटिसीनंतर थांबवण्यात येणार आहे.
भायखळा, बोरिवली भागात बांधकाम बंदी; हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी BMC चा निर्णय
Published on

मुंबई : भायखळा आणि बोरिवली पूर्व या भागांतील हवेचा गुणवत्तेचा निर्देशांक सतत २००च्या वर राहिल्यामुळे या ठिकाणांवरील बांधकाम येत्या २४ तासांकरिता नोटिसीनंतर थांबवण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारी जाहीर केले की, निर्देशांकातील सुधारापर्यंत शहरातील खासगी आणि शासकीय बांधकाम थांबविण्यात येणार आहेत. यामध्ये पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या कामांचाही समावेश आहे, अशी माहितीही देण्यात आली.

महापालिकेचे प्रशासक गगराणी हे मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या वायू गुणवत्ता निरीक्षण समितीचे अध्यक्षदेखील आहेत. या संदर्भातील निर्देशांचे पालन न केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्याच्या कलम ५२ अंतर्गत कारवाई करण्यात येईल आणि पोलीस तक्रारीही दाखल केल्या जातील, असा इशाराही गगराणी यांनी दिला आहे.

गगराणी म्हणाले की, संबंधित विकासक आणि एजन्सींना निर्देशांक सुरक्षित स्तरापर्यंत काम पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नाही. निर्देशांकात सुधार होईपर्यंत मुंबईत चर खोदण्यास कोणतीही परवानगी महापालिकेकडून दिली जाणार नाही.

मुंबईतील बोरिवली पूर्व आणि भायखळा या विभागांमध्ये हवेचे प्रदूषण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या विभागातील सर्व खाजगी आणि शासकीय प्रकल्प कामे तथा विकासकामे यांच्यावरती बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रदूषण जास्त प्रमाणात असलेल्या वरळी आणि कुलाबा नेव्ही नगर आदी भागांमध्ये विकासकामांवर विशेष लक्ष ठेवले जात असून लवकरात या सर्व बांधकामांवर बंदी आणली जाईल, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी दूषित हवामानाच्या ठिकाणांची म्हणजे बोरिवली पूर्व आणि भायखळा आदी भागांमध्ये सर्व खासगी व शासकीय विकासकामे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येथील सर्व विकासकामे तातडीने बंद करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. तर प्रदूषित हवामानाचा निर्देशांक २०० च्या खाली आहे अशा वरळी आणि कुलाबा नेव्ही नगर येथील कामांना प्रदूषण नियंत्रणात आणण्याचा सूचना केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न झाल्यास तेथील कामे तातडीने बंद करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

महापालिकेचे नागरिकांना आवाहन

वायू प्रदूषण टाळण्यासाठी शासन आणि प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांमध्ये नागरिकांचे सहकार्य व सहभाग मोलाचे.

नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करणे हितावह.

शक्य तितक्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, खासगी वाहनांचा वापर कमी करणे, उघड्यावर कचरा जाळू नये, यासाठी नागरिकांना आवाहन.

आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला

वायू गुणवत्ता निर्देशांक वाईट ते अतिधोकादायक असलेल्या दिवसांमध्ये शारीरिक व्यायाम - श्रम टाळावेत

वायू प्रदूषणाच्या कालावधीत फटाके फोडणे टाळावे.

सिगारेट, बिडी, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये.

घरामध्ये झाडू मारणेऐवजी ओल्या फडक्याचा वापर करावा.

बंद घरामध्ये डासांसाठी कॉइल, अगरबत्ती जाळणे टाळावे.

फळे, भाज्या आणि पाणी इत्यादींचे सेवन करावे.

घराबाहेर जायचे असल्यास डिस्पोजेबल मास्कचा वापर करावा.

श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, खोकला, छातीत अस्वस्थता किंवा वेदना झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

logo
marathi.freepressjournal.in