सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पासाठी सल्लागार; पालिका करणार तीन कोटी ७९ लाखांचा खर्च

मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची कमतरता भासत आहे. पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पालिकेकडून विविध प्रकल्प राबवत आहे.
सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पासाठी सल्लागार; पालिका करणार तीन कोटी ७९ लाखांचा खर्च

मुंबई : पिण्यायोग्य पाण्याची गरज लक्षात घेता सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करता यावा यासाठी सात ठिकाणी सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र उभारले असून, यातून दररोज १,२३२ दशलक्ष लिटर पिण्यायोग्य तयार करण्यात येणार आहे. सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून पिण्यायोग्य पाणी निर्माण करण्यासाठी पालिकेने सल्लागाराची नेमणूक केली आहे. पाणी वितरण व्यवस्थेत समाविष्ट करण्यासाठी महापालिकेकडून अहवाल बनवण्याची जबाबदारी सल्लागारावर असणार आहे. पालिका सल्लागार सेवेसाठी तब्बल तीन कोटी ७९ लाख रुपये खर्च करणार आहे.

मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची कमतरता भासत आहे. पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पालिकेकडून विविध प्रकल्प राबवत आहे. यात मुंबई महापालिका मुंबईतील सात सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून सुमारे १,२३२ दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी निर्माण करणार आहे. हे पाणी मुंबईच्या पाणी वितरण व्यवस्थेत समाविष्ट करण्यासाठी महापालिकेकडून अहवाल बनवला जाणार आहे. या अहवालासाठी मे. टंडन अर्बन सोल्युशन या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.

सांडपाणी केंद्रांतून प्रक्रिया होणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि वेळ यांचा अभ्यास करणे, पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करण्यासाठी लागणारी जमीन, प्रक्रिया केंद्रांच्या आसपास असलेल्या विद्यमान पाणीपुरवठा प्रणालीच्या माहितीचे संकलन तसेच पाणीपुरवठा प्रणालीचा तपशीलवार हायड्रोलिक अभ्यास करणे. त्याचे विभागीय पुरवठ्याचे तास, दाब, समस्या, पुरवठा पॅटर्न समजून घेणे आणि प्रस्तावित पिण्यायोग्य पाणी सामावून घेण्यासाठी मुख्य वितरक प्रणालीची क्षमता ओळखणे यांचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच नवीन जलवाहिन्या, झडपा बसवून किंवा संलग्न बांधकाम करून पाणी एकत्रीकरण प्रणालीची रचना करणे, पिण्यायोग्य पाण्याचे समायोजन करण्याचे काम केले जाणार आहे.

मुंबईला दररोजची ४५०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज

मुंबईची पाण्याची दररोजची गरज ४५०० दशलक्ष लिटर आहे; मात्र सध्या ३,८३० दशलक्ष लिटर इतका रोज पाणीपुरवठा सात धरणांतून केला जातो आहे. त्यात पाणी गळती, चोरी, जलवाहिन्या फुटून वाया जाणारे पाणी आदींमुळे पाणीसाठा कमी होतो. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी पालिकेसमोर आव्हान उभे राहावे लागते. सध्या अंदाजे ६७० दशलक्ष लिटर पाण्याची तूट आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात ही तूट आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यापैकी २४६४ दशलक्ष लिटर म्हणजे सुमारे ८० ते ९० टक्के भाग सांडपाण्याच्या रूपाने समुद्रात सोडला जातो. या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते वाचविण्याचा प्रयत्न पालिकेमार्फत केले जाणार आहे.

समुद्रात जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया!

समुद्रात वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप, घाटकोपर या ठिकाणी प्रकल्प उभारणी सुरू आहे. या प्रकल्पांतून दररोज सुमारे २४६४ दशलक्ष लिटर पाण्यावर तृतीय स्तरावरील प्रक्रिया केली जाईल. यातून ५० टक्के म्हणजे, १२३२ दशलक्ष लिटर पाणी पिण्यायोग्य करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in