मुंबई: केईएम रुग्णालाय प्रशासनाने रुग्णांना स्वच्छ आणि गरमागरम जेवण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्वच्छतेचे निकष पाळत थर्मल कंटेनरद्वारे जेवण रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. सध्या दोन हजार कंटेनर केईएम रुग्णालयात आले असून याद्वारे रुग्णांना जेवण पुरवण्यात येत आहे
केईएममधील अत्याधुनिक अशा आहारगृहाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी या अत्याधुनिक आहारगृहामुळे रुग्णांना गरमागरम आणि स्वच्छ जेवण देणे शक्य होणार असल्याचे डॉक्टर संगीता रावत यांनी सांगितले.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लांबून आलेल्या रुग्णांना घरगुती जेवण मिळणे अवघड असते. पैशांअभावी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने हॉटेलमधील अन्नदेखील रुग्णांना देता येत नाही. त्यामुळे पालिका आणि राज्य शासनाच्या रुग्णालयात सुरुवातीपासून रुग्णांना जेवण आणि नाष्टा देण्यात येतो. स्वच्छ आणि योग्य डाएटसाठी ओळखल्या जाणाऱ्या भायखळ्याच्या इस्कॉन संस्थेशी संपर्क साधून रुग्णालयातील कर्मचारी आणि आहार तज्ज्ञांची एक टीमने इस्कॉन संस्थेत पाठवण्यात आली. त्यानंतर सर्व माहिती घेऊन सुसज्ज आणि अत्याधुनिक असे किचन केईएम रुग्णालयात तयार करण्यात आले.