वांद्रे तलावात दूषित पाणी तलाव; परिसरात असामाजिक तत्वांचा वावर -वॉचडॉग फाऊंडेशनचा दावा

वॉचडॉग फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच या तलावाची पाहणी केली. या भेटीदरम्यान, तलावातील पाणी चिंताजनक पातळीवर विषारी झाल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.

मुंबई :  वांद्रे पश्चिम एस व्ही रोड वर असलेल्या वांद्रे तलावातील पाणी दूषित झाल्याचा दावा वाॅचडाॅग फाऊंडेशनने केला आहे. या तलावात विषारी द्रव तयार झाल्याने वनस्पतींना धोका निर्माण झाला आहे, असेही फाऊंडेशनचे म्हणणे आहे. तसेच तलाव परिसरात असामाजिक तत्वांचा वावर असून गर्दुल्ले दारुड्याचा अड्डा झाला आहे. मुंबई महापालिकेचे तलावाकडे दुर्लक्ष झाल्याने ही दुरवस्था झाल्याचा आरोप फाऊंडेशनने केला आहे. दरम्यान, मुंबईचे सुशोभीकरण प्रकल्प राबवण्यात येत असून या प्रकल्पा अंतर्गत तलावाची दुरुस्ती व पाण्याची स्वच्छता करावी, अशी मागणी फाऊंडेशनने पालिकेकडे केली आहे.

मुंबईतील जुन्या तलावांपैकी एक असलेल्या वांद्रे तलावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. ७.५ एकरवर विस्तारलेल्या या तलावाची पूर्वी 'कमळ तलाव' म्हणून ओळख होती सुमारे २०० वर्ष जुन्या असलेल्या या तलावाची बांधणी नवपारा या मुस्लिम व्यक्तीने केल्याची नोंद असल्याचे बोलले जाते.

या तलावाला हेरिटेज श्रेणी-२ चा दर्जा मिळाला आहे. सन १९९० पासून पर्यटकांसाठी बोटिंग सेवा सुरू करण्यात आली होती; मात्र काही दिवस वगळता ती सद्यस्थितीत बंदच आहे.

वॉचडॉग फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच या तलावाची पाहणी केली. या भेटीदरम्यान, तलावातील पाणी चिंताजनक पातळीवर विषारी झाल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. तलावातील पाण्यात अतिरिक्त पोषक तत्त्वांमुळे सायनोबॅक्टेरियाचा प्रसार होऊ शकतो. परिणामी एकपेशीय वनस्पतींची जलद वाढ होते आणि विषारी वनस्पतीची निर्मिती होते. वनस्पतींची ही वाढ तलावातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आणत असून,परिसरातील प्राणी आणि मानवांनाही गंभीर धोका निर्माण करतात, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी दिली.

तलाव परिसरात अस्वच्छता आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले होते, तो सर्व खर्च पाण्यात गेला आहे. रोज संध्याकाळी गर्दुल्ल्यांचा हा अड्डा झाला आहे. राजरोसपणे मद्यपान करणे, तलाव परिसरात उघड्यावर लघुशंका केली जाते. तसेच तलावाच्या भागात कचरा व रिकाम्या दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळून येतात. तलावाचे संरक्षण करण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची व पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in