Mumbai : मुख्यमंत्र्यांनाच अशुद्ध पाणी; मंत्रालयातील धक्कादायक प्रकार

मंत्रालयातील दूषित पाण्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चहापानासाठी अशुद्ध पाणी वापरले गेल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला.
Mumbai : मुख्यमंत्र्यांनाच अशुद्ध पाणी; मंत्रालयातील धक्कादायक प्रकार
Mumbai : मुख्यमंत्र्यांनाच अशुद्ध पाणी; मंत्रालयातील धक्कादायक प्रकार
Published on

मुंबई : मंत्रालयातील दूषित पाण्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चहापानासाठी अशुद्ध पाणी वापरले गेल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला.

खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्यांना देण्यात आलेल्या कॉफीला वास येत असल्याची तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने चहा- कॉफी तयार करणाऱ्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या चहा, कॉफीसाठी बाटलीबंद मिनरल पाण्याचा वापर सुरू झाला आहे.

Mumbai : मुख्यमंत्र्यांनाच अशुद्ध पाणी; मंत्रालयातील धक्कादायक प्रकार
Mumbai : दूषित पाण्याने मंत्रालयातील कर्मचारी बेजार; उलटी, जुलाब आणि तापाने त्रस्त, नागरिकांनाही त्रास

मंत्रालयातील पाणी दूषित आणि जीवाणू मिश्रित असल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले. या पाण्यामुळे मंत्रालयातील जवळपास ४० ते ५० टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांना जुलाब, ताप, उलटीचा त्रास सुरू झाला. काहींना तर दूषित पाण्याने काविळ झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खुद्द मुख्यमंत्र्यांना अशुद्ध पाण्याचा त्रास जाणवल्याची माहिती दिली.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात अनेक महत्वाच्या बैठका होतात. बैठकीच्या निमित्ताने येणारे मंत्री, लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी, अति महत्वाच्या व्यक्तींचे चहापान देऊन आदरातिथ्य केले जाते. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाला लागून छोटी कॅन्टीन आहे.

अशाच एका बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांना कॉफी देण्यात आली. त्यावेळी कॉफीला वास येत असल्याची तक्रार फडणवीस यांनी केली. या तक्रारीनंतर मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने चहा - कॉफी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. या प्रकरणी तुमच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा या अधिकाऱ्याने दिला.

तेव्हापासून मुख्यमंत्री कार्यालयाला लागणाऱ्या चहा - कॉफीसाठी बाटलीबंद मिनरल पाणी वापरले जात असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.

मंत्रालयातील पाण्याचा धसका

दूषित पाण्याने त्रास झाल्याने अधिकारी - कर्मचाऱ्यांनी मंत्रालयातील पाण्याचा चांगलाच धसका घेतला आहे. मंत्रालयातील पाणी पिण्याऐवजी अधिकारी - कर्मचाऱ्यांनी आता स्वखर्चाने बाटलीबंद पाणी वापरण्यास सुरुवात केली आहे. सध्या मंत्रालयातील अनेक अधिकाऱ्यांच्या दालनात बाटलीबंद पाण्याचा साठा दिसून येत आहे.

मुख्य सचिवांकडे तक्रार

दरम्यान, मंत्रालयातील दूषित पाणी पुरवठ्याला सार्वजनिक बांधकाम विभागाची हलगर्जी कारणीभूत असल्याचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मंत्रालयातील दूषित पाण्याची समस्या अद्याप दूर झाली नसल्याने गेल्या आठवड्यात शुक्रवारी काही अधिकारी - कर्मचाऱ्यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेऊन बांधकाम विभागाबद्दल तक्रार केल्याचे समजते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in