महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना दिलासा; १५ दिवसांत पीएफचे २२८ कोटी जमा करण्याचे पीएफ आयुक्तांचे पालिकेला आदेश

मुंबई महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत सफाई कामगारांचा २२८ कोटींचा प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) १५ दिवसांत जमा करा, असे आदेश प्रॉव्हिडंट फंड आयुक्तांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना दिलासा; १५ दिवसांत पीएफचे २२८ कोटी जमा करण्याचे पीएफ आयुक्तांचे पालिकेला आदेश

मुंबई : मुंबई महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत सफाई कामगारांचा २२८ कोटींचा प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) १५ दिवसांत जमा करा, असे आदेश प्रॉव्हिडंट फंड आयुक्तांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. पीएफ आयुक्तांच्या निर्णयामुळे कंत्राटी सफाई कामगारांना मोठा दिलासा मिळाल्याचे कचरा श्रमिक वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे म्हणाले.

घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांचे प्रॉव्हिडंट फंडाचे कामगारांच्या वेतनातून कापलेले पैसे प्रॉव्हिडंट फंडाच्या खात्यात जमा करण्यात आले नसल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी श्रमिक संघाने केली होती. त्याबाबत ८ एप्रिल २०२२ रोजी मोर्चा काढून लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीरपणे घेत पालिका आणि कंत्राटदार यांची प्रॉव्हिडंट फंडाचे प्रमुख अंमलबजावणी अधिकारी शैलेश ढोके आणि त्यांचे सहकारी यांची कसून चौकशी केली. चौकशीनंतर संघाच्या तक्रारीत सत्यता आढळून आल्याने विभागीय प्रॉव्हिडंट फंड आयुक्त रंजन कुमार साहू यांनी गेल्या २१ डिसेंबर रोजी पालिकेला जानेवारी २०११ ते २०१६ या कालावधीतील २२८ कोटी ७ लाख २१ हजार रुपये १५ दिवसात प्रॉव्हिडंट फंड कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती रानडे यांनी दिली.

१९० कोटी गेले कुठे, उच्चस्तरीय चौकशी करा

पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे २००९ सालापासून १९० कोटी रुपये गेले कुठे, अशी विचारणा पालिकेवर मोर्चा काढून कंत्राटी कामगारांनी केली होती. प्रत्येक कामगारांच्या खात्यात ३ लाख ८० हजार प्रॉव्हिडंट फंडात जमा झाले नाहीत. पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने पैशाचा गैरव्यवहार झाला आहे. सफाई कामगारांच्या मेहनतीचे पैसे कुठे गेले, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघाचे अध्यक्ष दीपक भालेराव यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in