कंत्राटी कर्मचारी आक्रमक; आरोग्य विभागाच्या मुख्यालयावर मोर्चा, वार्षिक वेतनवाढ देण्याची मागणी

कामगार, कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आधी अदा करण्यात यावे, वार्षिक वेतनवाढ नियमाने देण्यात यावी, महिलांना प्रसूती रजा भरपगारी मिळावी यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या आरोग्य केंद्रात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या सुमारे १२०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाचे मुख्यालय, एफ/दक्षिण विभाग येथे मोर्चा काढला.
कंत्राटी कर्मचारी आक्रमक; आरोग्य विभागाच्या मुख्यालयावर मोर्चा, वार्षिक वेतनवाढ देण्याची मागणी
Published on

मुंबई : कामगार, कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आधी अदा करण्यात यावे, वार्षिक वेतनवाढ नियमाने देण्यात यावी, महिलांना प्रसूती रजा भरपगारी मिळावी यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या आरोग्य केंद्रात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या सुमारे १२०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाचे मुख्यालय, एफ/दक्षिण विभाग येथे मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व चिटणीस संजय वाघ यांनी केले.

मोर्चाच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांची भेट घेतली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर येत्या दोन दिवसांत बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे लेखी आश्वासन डॉ. दक्षा शहा यांनी शिष्टमंडळाला दिले.

एका कंपनीमार्फत हे कर्मचारी पालिकेच्या आरोग्य खात्यात पुरविले गेले आहेत. त्या कंपनीने या कर्मचाऱ्यांना नियमित पगार दिलेला नाही. तसेच पगारवाढ, रजा, महिलांना बाळंतपणाची रजा, बोनस इ. गोष्टी करारान्वये मान्य करूनही दिल्या नाहीत. तसेच राज्य शासनाचा वैद्यकीय विमा असताना डी. एस. अंतर्गत खासगी विमा घेण्यास भाग पाडले जात होते. त्यामुळे या सर्व १२०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सभासदत्व पत्करून प्रशासनाविरोधी अध्यक्ष बाबा कदम व चिटणीस संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला. यावेळी मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.

तोपर्यंत लढा सुरूच राहणार

प्रशासनाने दिलेले लेखी आश्वासन जोपर्यंत कृतीमध्ये दिसून येत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार. मात्र पुढील बैठक होईपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्याची घोषणा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in