कंत्राटी कामगारांना आता बेस्ट बसेसने मोफत प्रवास

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने पुढाकार घेतला असून बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसचा समावेश केला जात आहे
कंत्राटी कामगारांना आता बेस्ट बसेसने मोफत प्रवास

मुंबई : बेस्ट बसेसमध्ये प्रवासाची मोफत सुविधा द्या, या बेस्ट उपक्रमातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मागणीला यश आले आहे. बुधवार १ नोव्हेंबरपासून बेस्ट उपक्रमाने ही सुविधा उपलब्ध केल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने पुढाकार घेतला असून बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसचा समावेश केला जात आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात बेस्टच्या स्वमालकीच्या १,२८४ तर भाडेतत्त्वावरील १,६९४ अशा एकूण २,९७८ बसेस आहेत. १६,५६३ बस चालक व वाहक कार्यरत आहेत. बेस्ट उपक्रमात भाडेतत्त्वावरील बसेस चालवणारे कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यात बेस्टच्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, ही त्यांची प्रमुख मागणी होती. अखेर भाडेतत्त्वावरील बसेस चालवणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मागणीला यश आले असून एसी व विनाएसी बसने मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, बसपासचे मासिक मूल्य ३७५ रुपये असून या बसपासचे मूल्य संबंधित कंपनी बेस्ट उपक्रमाला देणार आहे.

बस पुरवठादार करणाऱ्या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे उपक्रमाच्या बेस्ट गाड्यांमधून मोफत प्रवास करण्याची अनुमती दिल्याची सूचना बेस्ट उपक्रमातर्फे संबंधित कर्मचारी, अधिकारी यांना देण्यात आलेली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in