हमी कालावधीत खड्डा पडल्यास कंत्राटदाराला दंड; खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पालिकेची कठोर अंमलबजावणी

मुंबईत ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी पालिकेकडून कार्यवाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात रस्त्यावर खड्डे पडूच नयेत यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत.
हमी कालावधीत खड्डा पडल्यास कंत्राटदाराला दंड; खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पालिकेची कठोर अंमलबजावणी

मुंबई : खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आता हमी कालावधीत रस्त्यावर खड्डा पडल्यास कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. यापुढे देण्यात येणाऱ्या रस्ते कामातील हमी कालावधीच्या अटी-शर्तीत बदल करण्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे बेजबाबदार कंत्राटदारावर अंकुश राहील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंबई महापालिकेला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी सहा हजार कोटींचे कंत्राट दिले आहे. मात्र रस्ते कंत्राटात कंत्राटदार हमी कालावधीकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हमी कालावधीत रस्त्यावर खड्डा पडल्यास कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईत ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी पालिकेकडून कार्यवाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात रस्त्यावर खड्डे पडूच नयेत यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी पाच वर्षांचा तर डांबरी रस्त्यांना तीन वर्षांचा ‘हमी कालावधी’ असतो. या ‘हमी कालावधी’त रस्त्याची देखभाल दुरुस्ती संबंधित कंत्राटदाराने करणे आवश्यक असते. मात्र आता खड्डे पडूच नये यासाठी कंत्राटदारांना कठोर नियमावली तयार करणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाकडून देण्यात आले.

मास्टीक तंत्रज्ञानाने दुरुस्ती

मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्याआधी दुरुस्ती, खड्डे बुजवण्याचे काम करताना केवळ खड्डे न बुजवता मास्टीक सर्फेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामुळे फक्त खड्डा बुजवण्याचे काम न होता संपूर्ण रस्ताच नव्या स्वरूपात तयार होणार आहे. खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स अपयशी ठरत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in