असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्रीच चांगला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या टीकेला जोरदार प्रत्‍युत्तर दिले.
असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्रीच  चांगला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही चांगला, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता प्रत्‍युत्‍तर दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी ज्यांनी बेईमानी केली त्यांच्याशी आम्ही फारकत घेतली. त्यामुळे आम्हाला भाडोत्री फौजफाट्याची आवश्यकता नाही, असेही शिंदे यांनी ठाकरे यांना सुनावले.

विरोधी पक्षाच्यावतीने विधानसभेत मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्त्वावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या टीकेला जोरदार प्रत्‍युत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपशी युती करून निवडून आलो. जनतेने आम्हाला बहुमत दिले. मात्र, त्यानंतर अनैसर्गिक आघाडी करून बाळासाहेबांच्या वैचारिक अधिष्ठानाशी बेईमानी कुणी केली, असा सवाल करताना आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी, हिंदुत्वाची बेईमानी केली असती तर आमच्यासाठी रस्ताच्या दुतर्फा लोक थांबले असते का? असा सवालही शिंदे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री, असा केला होता. या टीकेचा शिंदे यांनी समाचार घेतला. मी महाराष्ट्राच्या विकासाचे, राज्याच्या समृद्धीचे, गोरगरीब तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि बहुजनांच्या हितासाठी मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे, असे जोरदार प्रत्युत्तर शिंदे यांनी दिले. जीवन उसी का मस्त है, जो समाज की उन्नती में व्यस्त है, परेशान वही, जो दुसरों की उन्नती में त्रस्त है! असा शेर सुनावत त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या सरकारमध्ये केवळ ४० आमदारांचे लाड सुरु आहेत, अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी आम्ही आमच्या आमदारांवर लक्ष देत आहोत. तुमच्या काही लोकांवरही माझे लक्ष आहे. त्यांनाही मदत करणार आहे, असे सांगत शिंदे यांनी महाविकास आघाडीची बांधली होती मोट, मुख्य बसले होते घरी आणि तुम्ही चालवत होते बोट, असा टोला पवार यांना लगावला.

पहाटे दादांनी घाई केली

अजित पवारांनी मला श्रद्धा आणि सबुरीचाही सल्ला दिला आहे. मी कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. माझा तो स्वभाव नाही. आम्ही जे केलं ते उघडपणे केलं. आम्ही श्रद्धा आणि सबुरीनेच वागतो आहे. पहाटे शपथविधीवेळी अजितदादांनी थोडी घाई केली. थोडं सबुरीने घेतलं असतं तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. जयंत पाटील यावर हसत आहेत. मला आठवतंय, जयंत पाटील म्हणाले होते की, चुकीचा कार्यक्रम झाला. मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in