पश्चिम द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिकची समस्या दूर करण्यासाठी ४ ठिकाणी प्रवेश नियंत्रण रस्ते

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी चार ठिकाणी प्रवेश नियंत्रण रस्ते म्हणजेच...
पश्चिम द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिकची समस्या दूर करण्यासाठी ४ ठिकाणी प्रवेश नियंत्रण रस्ते
Published on

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी चार ठिकाणी प्रवेश नियंत्रण रस्ते म्हणजेच एक भूमिगत आणि नंतर उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. दोन रस्ते सांताक्रुझ, विलेपार्ले भागात असून, एक बोरिवली व एक बीकेसी ते दक्षिण मुंबईच्या दिशेने असणार आहे. या कामांसाठी मुंबई महापालिका तब्बल ८०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिका विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. त्याच प्रमाणे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी चार ठिकाणी प्रवेश नियंत्रण रस्ते बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील चार प्रमुख जंक्शन्सवर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी दोन स्तरांवर काम करण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी अधिक वाहनांची अधिक गर्दी होऊ नये म्हणून वाहतूक वेगळी करण्यासाठी भूमिगत किंवा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे.

दोन वर्षांत काम पूर्ण होणे अपेक्षित

आर. पी. शाह या कंत्राटदाराची या कामासाठी निवड करण्यात आली असून या कामासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये निविदा मागवण्यात आली होती. लवकरच या कामाचे स्वीकृती पत्र जारी करण्यात येणार आहे. मार्चमध्ये हे काम सुरू करून पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

बीकेसी कनेक्टरचा विस्तार

विद्यमान परिस्थितीत बीकेसीला जोडणाऱ्या मार्गापासून (कनेक्टर) दक्षिण मुंबईकडे संपर्क मार्ग नाही. त्यामुळे सायनकडून होणारी वाहतूक उत्तरेकडे कुर्ला उड्डाणपुलाकडे जाते. परिणामी पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण होते. यावर उपाय म्हणून बीकेसी कनेक्टरपासून दक्षिण मुंबईला जाण्यासाठी एक यू-पद्धतीचा उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. उड्डाणपूल सायन ते बीकेसी आणि बीकेसी ते सायनपर्यंत ८.५ मीटर रुंद असेल आणि बीकेसी कनेक्टरच्या दिशेने जाणाऱ्या संलग्न मार्गापर्यंत ४ मीटर रुंद उन्नत मार्ग प्रवेश आणि बीकेसी ते सायन दरम्यान ४ मीटर रुंद निर्गमन मार्ग असेल. या प्रकल्पात वडाळा ते सायन/बीकेसीपासून उड्डाणपूल जोडणारा ४ मीटर रुंद एकमार्गी दुतर्फा कनेक्टरचा देखील समावेश आहे.

बोरिवलीत वाहतूककोंडीची समस्या दूर होणार

या उड्डाणपुलाला पश्चिम द्रुतगती महामार्गावर थेट प्रवेश नाही. त्यामुळे नॅशनल पार्क जंक्शन आणि ओवरीपाडा मेट्रो स्टेशन जंक्शन येथे वाहतूककोंडी होते. महामार्गावर थेट प्रवेश मिळाल्यास या भागातील वाहतूककोंडी कमी होईल. या प्रस्तावात महामार्गाचा मुख्य संलग्न मार्ग सुमारे ३.५ मीटर वाढवणे आणि दुहेरी चार मार्गिकांची रुंदी आणि लांबी अनुक्रमे ३१ मीटर आणि ३१० मीटर होईल. तसेच २५ मीटर बाय ४ मीटरच्या अंतरात वाहनांसाठी सहा मार्गिकांच्या भूमिगत मार्गाचा समावेश आहे. बोरिवली ते वांद्र्याकडे जाणारी वाहतूक यामुळे सुरळीत होईल.

विलेपार्ल्यात पादचारी भूमिगत मार्ग !

या मार्गावर जाण्यासाठी महामार्गावरून थेट प्रवेश नसल्याने कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल आणि विलेपार्ले पूर्व येथून जाणारी वाहतूक विमानतळ जंक्शनकडे वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांची गर्दी होते. या ठिकाणी महामार्गाचा मुख्य संलग्न मार्ग सुमारे २.७५ मीटर वाढवणे आणि दुहेरी पाच मार्गिकांचा सुमारे ३८.५ मीटर आणि ४३० मीटर रुंदी आणि लांबीचा समावेश आहे. तसेच ६.५ मीटर बाय ४ मीटरच्या अंतर्गत आकाराच्या मध्यवर्ती एकमार्गी भूमिगत मार्गाचा समावेश आहे. हनुमान रोडवरून वांद्र्याच्या दिशेने प्रवास करण्यासाठी सध्याच्या पादचारी आणि वाहनांच्या वाहतुकीसाठी ६ मीटर बाय २.५ मीटरचा अंतर्गत आकाराचा पादचारी भूमिगत मार्ग तयार करण्यात येणार आहे.

मिलन सबवे जंक्शनची वाहतूककोंडी फुटणार

वाकोला जंक्शनपासून निर्माण होणाऱ्या वाहतुकीचा सांताक्रुझ पूर्वेतील रहदारीवर परिणाम होतो. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावरून थेट प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी या महामार्गाचा मुख्य संलग्न मार्ग सुमारे २.५ मीटर वाढवणे आणि अनुक्रमे ३७.५ मीटर आणि ५०० ​​मीटर करणे अशा दुहेरी पाच मार्गिकांचा समावेश आहे. मिलन सब वे ते वांद्र्यापर्यंत उजवीकडे आणि अंधेरी ते मिलन सबवे मार्गाने डावीकडची वाहतूक सुलभ करण्यासाठी दोन्ही सेवा रस्त्यांना जोडणारे २५ मीटर बाय ४ मीटरच्या अंतर्गत आकाराच्या सहा मार्गिकांवरून दुतर्फा वाहने जातील, अशी व्यवस्था प्रस्तावित आहे.

logo
marathi.freepressjournal.in