
सध्या काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. यावेळी मंगळवारी वाशिम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या सभेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी म्हंटले की, इंग्रजांच्या विरोधात लढताना बिरसा मुंडा एक इंचही मागे हटले नाही. ते शहीद झाले. ते आदिवासी समाजाचं प्रतिक आहेत, ते तुमच्या समाजासाठी मार्गदर्शक आहेत. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
खासदार राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रातच थांबवा; भाजपची मागणी
यावरून महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून भाजप विरुद्ध राहुल गांधी असं वाद सुरु झाला आहे. "राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा आणि त्यांना कायद्याचे राज्य असल्याचे दाखवून द्या, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
माझ्या वक्तव्यांवर मी ठाम: राहुल गांधी
स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतीत वादग्रस्त दावे केल्यानंतर राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली. यानंतर अकोला येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन 'आपल्या मतांवर ठाम असल्याचे सांगितले. एवढंच नव्हे तर पत्रकार परिषदेत सावरकरांचे माफीचे पत्रच माध्यमांसमोर दाखवले. राहुल गांधी यांनी यावेळी म्हंटले की, "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांना माफीचे पत्र लिहिले होते, यावर मी ठाम आहे. हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघलाचक मोहन भागवत यांनाही दाखवा. पत्रात सावरकरांनी इंग्रजांना उद्देशून असे लिहिले आहे की, 'सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ'. या पत्राच्या खाली वीर सावरकर यांची स्वाक्षरीही आहे. ही स्वाक्षरी केल्यानंतर सावरकरांनी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनाही अशी सही करण्यास सांगितले होते. असे म्हणून सावरकरांनी सर्व देशासोबत तसेच तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात असलेल्या काँग्रेसशी विश्वासघात केला होता."