आमदार नाही तरी निधी मिळतो! सरवणकर यांच्या विधानामुळे वाद

आमदार नाही तरी निधी मिळतो! सरवणकर यांच्या विधानामुळे वाद

मी आमदार नाही तरी २० कोटींचा निधी मिळतो, असे विधान माजी आमदार सदा सरवणकर यांनी केले. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले असून सरवणकर मिळालेला निधी स्वतःच्या विकासासाठी वापरतात, असा गंभीर आरोप महेश सावंत यांनी केला आहे. त्यामुळे सरवणकर विरुद्ध सावंत असा सामना पुढील काही दिवस रंगणार आहे.
Published on

मुंबई : मी आमदार नाही तरी २० कोटींचा निधी मिळतो, असे विधान माजी आमदार सदा सरवणकर यांनी केले. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले असून सरवणकर मिळालेला निधी स्वतःच्या विकासासाठी वापरतात, असा गंभीर आरोप महेश सावंत यांनी केला आहे. त्यामुळे सरवणकर विरुद्ध सावंत असा सामना पुढील काही दिवस रंगणार आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांचा २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी दारुण पराभव केला. त्यावेळेपासून सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत असा सामना रंगतोय.

आमदार नसताना सुद्धा २० कोटी मिळत असल्याचा दावा सरवणकरांनी केला आहे. पण त्यांच्या या दाव्यावर आता माहीम विधानसभेचे आमदार महेश सावंत यांनी जहरी टीका केली आहे. शाखा, कार्यालयांत लोकांची वर्दळ असते. ते माजी आमदार कुठे बसतात ? ते कुठे असतात? हे अद्यापही लोकांना कळत नाही. हा निधी त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी काय स्वतःचा विकास केला आहे का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

लोकांनी त्यांना घरी बसवत सबुरीचा सल्ला दिला की, आता तुमचे वय झाले आहे, त्यामुळे तुम्हाला आराम करण्याची गरज आहे. पण ते आराम न करता उचापत्या करत आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांच्यामध्ये नैराश्य आले आहे, त्यामुळे अशी वक्तव्य करत आहेत, अशी टीका सावंत यांनी सरवणकर यांच्यावर केली आहे.

आम्हाला जर वर्षाला पाच कोटीचा निधी मिळत असेल आणि माजी आमदाराला वर्षाला २० कोटींचा निधी मिळत असेल तर हे चुकीचे आहे. माजी आमदाराला २० कोटींचा निधी ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली खैरात आहे, असा दावा सावंत यांनी केला आहे.

महेश सावंत, शिवसेना आमदार

logo
marathi.freepressjournal.in