नितीश कुमारांच्या वक्तव्यावरून वादंग महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी : विरोधकांची राजीनाम्याची मागणी

नितीशकुमार यांच्या वक्तव्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘इंडीया आघाडीचे लोक केंद्र सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
नितीश कुमारांच्या वक्तव्यावरून वादंग
महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी : विरोधकांची राजीनाम्याची मागणी
@ANI

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारच्या विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावर माष्य करताना महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादंग निर्माण झाले आहे. नितीशकुमार यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधी सदस्यांनी जोरदार ताशेरे ओढत दुपारी २ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित केले. नितीशकुमार यांनी या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली तर विरोधकांनी गदारोळ उठवून सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले. भाजपने त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

सभागृहात आपल्या विधानाबद्दल स्पष्टीकरण देण्याची तयारी नितीशकुमार यांनी दर्शविली. पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आपल्या विधानामुळे कोणाचा अवमान झाला असेल तर आपण त्याबद्दल माफी मागतो, असे त्यांनी सांगितले. महिलांसंबंधात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्ष नेते विजयकुमार सिन्हा आपल्या जागेवर उभे राहिले व त्यांनी नितीशकुमार हे मनोरुग्ण असल्याचा दावा करीत ते राज्यावर शासन करण्यास अयोग्य असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

दरम्यान, महाआघाडी सरकारला डाव्या पक्षंच्या महिला शाखेने पाठिंबा व्यक्त केला आहे. माकप संलग्न एआयडीडब्लूए आणि सीपीआयच्या एमएल गटाशी संलग्न एआयपीडब्लूए यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जी भाषा वापरली त्यांची जी देहबोली होती, ती अश्लील असून त्यांनी माफी मागावी, असे पत्रक जारी केले.

नितीश कुमार यांनी मंगळवारी विहार विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावर बोलत असताना मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली. पण, त्यांनी त्यावर केलेल्या टिप्पणीमुळे सभागृहात उपस्थित असलेल्या महिला आमदार खाजिल झाल्या. नितीश कुमारांच्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नितीश कुमार म्हणाले होते, “पुरुष रोज रात्री पत्नीशी संबंध निर्माण करतात. यामुळे मूल जन्माला येते. परंतु, मुली साक्षर असतील तर प्रजनन दर घसरतो. तिने शालेय शिक्षण पूर्ण केले असेल तर प्रजनन दर राष्ट्रीय स्तरावर १.७ टक्क्यांपर्यंत खाली येतो. नितीश कुमार पुढे लैंगिक शिक्षणावरही बोलले. लैंगिक शिक्षणावर बोलताना त्यांनी केलेलं वक्तव्य किळसवाणं होतं, असा आरोप विरोधक करत आहेत.

हे काय तुमचं भलं करणार-मोदी

नितीशकुमार यांच्या वक्तव्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘इंडीया आघाडीचे लोक केंद्र सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार पाडण्याच्या गप्पा मारत आहेत. त्यांच्यातला एक नेता माता-भगिनींबाबत घाणेरडं, आक्षेपार्ह विधान करतोय. तुम्ही अजून किती खाली जाणार आहात? जगभरात आपल्या देशाला अजून किती अपमानित करणार आहात? पण, तुमच्या सन्मानासाठी मी सगळं करेन. मी मागे हटणार नाही. त्यांना कसलीच शरम नाही. जे लोक माता-भगिनींप्रती असा विचार करत असतील ते तुमचं काय भलं करणार? हे लोक तुमची आब्रू वाचवू शकतात का? आपल्या देशाचं किती मोठं दुर्दैव आहे बघा,’’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी नितीशकुमार यांचा समाचार घेतला.

logo
marathi.freepressjournal.in