आता राष्ट्रवादीत व्हीपवरून वाद; छगन भुजबळांच्या वक्तव्यामुळे खळबळ

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे मुख्य भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली
आता राष्ट्रवादीत व्हीपवरून वाद; छगन भुजबळांच्या वक्तव्यामुळे खळबळ

मुंबई : शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. या निकालानंतर शिंदे गटाने बजावलेला व्हीप ठाकरे गटाला लागू होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. असेच प्रकरण राष्ट्रवादीतही असून, त्याचा निकाल ३१ जानेवारीला द्यावा लागणार आहे. राष्ट्रवादीच्या निकालाआधीच व्हीपवरून वादविवाद रंगल्याचे दिसून येत आहे. अशातच मंत्री भुजबळांनी केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही गटात खळबळ उडाली आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे मुख्य भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली. तर मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेले व्हीप हे राहुल नार्वेकर यांनी बेकायदा ठरवले आहेत. हाच मुद्दा हेरून राष्ट्रवादी अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांनी व्हीप आमचाच आहे, असे वक्तव्य केले आहे.

भुजबळ म्हणाले की, “आमचा पूर्वीचाच व्हीप आहे. आम्ही व्हीप बदलेला नाही. त्यामुळे शिवसेना आणि आमच्या प्रकरणात फार मोठा फरक आहे. शिवसेनेत व्हीपने दिलेले आदेश बरोबर आहेत का? नेमणूक बरोबर आहे का? असे असंख्य प्रश्न उपस्थित झाले होते. पण, आमच्याकडे हा प्रश्नच उपस्थित होत नाही. त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे.”

खरा राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा निकाल ३१ जानेवारी रोजी अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. तेव्हा हा निकाल कोणाच्या बाजुने लागतो, हे पाहावे लागणार आहे. २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले असून, पक्ष आणि चिन्हाची लढाई निवडणूक आयोगात पार पडली आहे. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा निकाल राखीव ठेवला असून, अशातच सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी राष्ट्रवादीबाबत निकाल देण्याचे आदेश दिले आहेत.

आमची बाजू बहुमताची -जयंत पाटील

छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या निकालाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर भाष्य केले. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “विधानसभा अध्यक्षांसमोर आमची बाजू अद्याप मांडायची आहे. आमची बहुमताची बाजू असून, ती अध्यक्षांसमोर मांडू. अध्यक्षांना योग्य निर्णय करावा लागेल.”

logo
marathi.freepressjournal.in