मुंबई : जुन्या गावठाणांपैकी माझगाव येथील म्हातारपाखडी गावठाण. गावठाण परिसरात समूह पुनर्विकासावरून वादाची ठिणगी पेटली आहे. गावठाण परिसरातील पुनर्विकासामुळे हेरिटेज वास्तूंना धोका निर्माण होण्याची शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली आहे, तर ५० वर्षांनंतर पुनर्विकास होणार. कोणतेही नुकसान न होता पुनर्विकास होईल, असा विश्वास समूह पुनर्विकासातील रहिवाशांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गेल्या ५० वर्षांपासून माहीम, प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिरात वास्तव्य करत असून संक्रमण शिबिराची दुरवस्था झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
दक्षिण मुंबईतील माझगाव येथील म्हातारपाखडी व गिरगावात खोताची वाडी ही दोन गावठाण आहेत. माझगाव येथील म्हातारपाखडी गावठाणजवळ असलेल्या म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. याठिकाणी ५० ते ६० वर्षांहून अधिक ३२ जुन्या चाळी असून त्यात ४०० कुटुंबीय वास्तव्यास आहेत. चाळी धोकादायक ठरल्याने तसेच असंख्य चाळी कोसळल्याने येथील शेकडो रहिवाशांना १९७० पासून अँटॉप हिल, मुलुंड, माहीम, सायन प्रतीक्षा नगर, विक्रोळी येथील संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. चाळींच्या पुनर्विकासासाठी विकासक निश्चिंत झाला असून पालिकेने इरादा पत्र (एलओआय) जारी केले आहे. गावठाणात पोर्तुगीज, ब्रिटिशकालीन बंगले, इमारती असून त्यांच्या आकर्षक रचनांसाठी या वास्तू प्रसिद्ध आहेत. या वास्तूंना हेरिटेज दर्जा मिळाला असून कोणतीही दुरुस्ती, डागडुजी करताना सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
म्हातारपाखडी गावठाण परिसरातील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होणार म्हणून मुलुंड गव्हाण पाडा येथील संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले. या संक्रमण शिबिरात २५ वर्षांहून अधिक काळ झाला. संक्रमण शिबिरात असुविधांचा सामना करावा लागतो. पूर्वजांनी १९०२ मध्ये म्हातारपाखाडीत पुनर्विकासासाठी प्रस्तावित असलेल्या एका इमारतीत घर विकत घेतले होते. १९७५ मध्ये आमची इमारत कोसळली तेव्हापासून आम्ही संक्रमण शिबिरांमध्ये राहत आहोत. इमारतींचा पुनर्विकास झाल्यास आमचा निवासाचा मोठा प्रश्न सुटणार असल्याचे जनार्दन करकेरा यांनी सांगितले.
माहीम येथील संक्रमण शिबिरात राहणारे रहिवासी इवान फर्नांडिस यांनी अनेक दशकांनंतर आमच्या इमारतींचा पुनर्विकास होत असून आमच्यासाठी ही मोठी संधी आहे. त्याला कुणी विरोध करू नये, अशी विनंती केली आहे.
इमारतींचा पुनर्विकास ही अत्यावश्यक बाब बनली असल्याचे सांगितले. इमारती धोकादायक बनल्या असून मलनिःसारण व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे रहिवाशांच्या घरामध्ये दूषित पाणी येत आहे. येथील रस्ते, सर्व मालमत्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित आहेत. जमिनीच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण केले जात नाही. काही मोजके लोक विरोध करत आहेत. हेरिटेज बांधकामांना कोणताही धक्का लागणार नाही, याची हमी विकासकाने दिली आहे. दोन पिढ्या संक्रमण शिबिरात घालवल्यानंतर आम्हाला ही पुनर्विकासाची संधी मिळाली आहे. त्यास कुणी विरोध करू नये, असे आवाहन धनंजय तारी व शरद सातार्डेकर यांनी केले आहे.