महायुतीत रंगला वाद : मावळ, सिंधुदुर्गात बेबनाव जागावाटपाआधीच दावे-प्रतिदावे

राज्यात लोकसभा निवडणुकीचा मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. तसेच जागावाटपाची चर्चाही सुरू झाली
महायुतीत रंगला वाद : मावळ, सिंधुदुर्गात बेबनाव जागावाटपाआधीच दावे-प्रतिदावे

विशेष प्रतिनिधी/मुंबई: एकीकडे महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात आहे. तसेच जागावाटपही जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगून मिशन ४५ प्लससाठी मैदानात उतरण्याची भाषाही सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात एका-एका जागेवरून दावे-प्रतिदावे सुरू असल्याने जागावाटपाचा वाद शेवटच्या क्षणापर्यंत ताणला जाण्याची शक्यता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत. मात्र, तेथे अजित पवार गटाने दावा केला आहे, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे. मात्र, तिथे शिंदे गटाचे उदय सामंत यांनी आपल्या भावासाठी ही जागा मागितली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री राणे यांनी सामंत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीचा मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. तसेच जागावाटपाची चर्चाही सुरू झाली आहे. त्यात सत्ताधारी महायुतीने तर आता जिल्ह्याजिल्ह्यात मेळावे घेण्याचीही तयारी केली आहे. त्यामुळे सर्वत्र वातावरण ढवळून निघण्याची चिन्हे असतानाच जागावाटपावरून एक-एका मतदारसंघातील वाद चव्हाट्यावर यायला लागला आहे. महायुतीत तीन प्रमुख पक्ष आणि छोटे मित्रपक्ष आहेत. यांच्यातील जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचा दावा करण्यात येत असून, ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार बोलून दाखविला आहे. त्यामुळे महायुतीचे एक पाऊल पुढे पडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात एक-एका जागेसाठीचा वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे.

मावळ मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ६ जानेवारी रोजी मेळावा आहे. या माध्यमातून शिंदे गट मतदारसंघावर आपला दावा मजबूत करीत आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर आता नवा वाद समोर आला आहे. एकीकडे शिंदे गट श्रीरंग बारणे यांच्यासाठी तयारी करीत असताना अजित पवार गटाचे आमदार पुन्हा पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्याची मागणी करीत आहे. पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र आहेत. पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी ही मागणी केली आहे. याअगोदर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातही तीच परिस्थिती आहे. हा मतदारसंघ भाजपला हवा आहे. येथून राणेंचे पुत्र पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. मुळात महायुतीत या जागेसाठी ३ दावेदार आहेत. यामध्ये माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटातील नेते किरण सामंत यांचा समावेश आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरूनही महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा वादही चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एकीकडे निवडणुकीची तयारी सुरू झालेली असतानाच मतदारसंघातील बेबनाव महायुतीची डोकेदुखी वाढविण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in