कूपर रुग्णालयात डॉक्टरांची भरती होणार; NICU, ICU खाटांची संख्या वाढवणार

कूपर रुग्णालयात डॉक्टरांची भरती होणार; NICU, ICU खाटांची संख्या वाढवणार

विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय काही दिवसांपासून अस्वच्छतेमुळे चर्चेत असतानाच सोमवारी डॉक्टरांची पदे लवकर भरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालय प्रशासन एनआयसीयू व आयसीयू खाटांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्पष्ट केले.
Published on

मुंबई : विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय मागील काही दिवसापासून अस्वच्छतेमुळे चर्चेत आले असतानाच सोमवारी रुग्णालयातील डॉक्टरांची पदे लवकर भरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एनआयसीयू आणि आयसीयू खाटांची संख्या वाढवण्यासाठी रुग्णालय प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्पष्ट केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रु. न. कूपर रुग्णालय येथील रुग्णसेवा आणि दैनंदिन कामकाजाचा आढावा घेणारी बैठक स्थानिक खासदार रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. नीलम अंद्राडे, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रुग्णालय प्रशासनामार्फत बैठकीदरम्यान सांगण्यात आले की, कूपर रुग्णालयात डॉक्टरांची भरती प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही सुरू असून ही पदे लवकर भरण्यात येणार आहे. तसेच एनआयसीयू आणि आयसीयू खाटांची संख्या वाढवण्यासाठी रुग्णालय प्रशासन प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसांमध्ये केमोथेरेपी सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. तर रुग्णांसाठी औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना

उंदरांमुळे चर्चेत आलेल्या कूपर रुग्णालय परिसरात अधिकाधिक स्वच्छता ठेवण्यासाठी तसेच उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनामार्फत देण्यात आली. त्याचबरोबर रुग्णाशी आणि नातेवाईकांशी संवाद साधन्यासाठी डॉक्टर आणि सुरक्षारक्षकांना संभाषण कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी याप्रसंगी केले.

logo
marathi.freepressjournal.in